नागपूर - प्रादेशिक हवामान विभागाने नागपूरसह विदर्भात 'हिट वे'चा रेड अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनंतर नागपूरसह संपूर्ण विधर्भातील तापमाणात पुन्हा २.५ अंशाची वाढ झाली आहे. पुढील ३ दिवस विदर्भात हीच परिस्थिती राहणार आहे. आज नागपुरातील तापमान ४६.३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. त्यामुळे या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
गेल्या ८ दिवसांपासून नागपूरसह विदर्भात सूर्यनारायण चांगलाच तळपत आहे. त्यामुळे उकाड्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तर तापमानाचा पारा ४७ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत.
आज प्रादेशिक हवामान विभागाने नागपूरसह विदर्भात 'हिट वे'चा रेड अलर्ट जाहीर केल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. नागपुरातसुद्धा गेल्या ८ दिवसांपासून तापमान हे ४३ ते ४४ अंशाच्या घरात आहे. मात्र आज हवामान विभागाने जाहीर केलेल्या रेड अलर्टनुसार नागपूरच्या तापमानात २.५ अंशाची वाढ झाली आहे. आज नागपुरातील तापमान ४६.३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. पुढील ३ दिवस अशाच प्रकारची परिस्थिती राहणार असल्याने विदर्भवासियांसाठी हे दिवस अत्यंत कठीण जाणार हे मात्र निश्चित.