नागपूर - सध्या कोरोनामुळे जनजीवन सावरत असताना बाजारात फळांच्या भावात तेजी दिसून येत आहे. संत्रा असो की सफरचंद असो की डाळिंब सध्या चढ्या भावात विकले जात आहेत. पण ही भाववाढ केवळ मागणी वाढली म्हणून नाही तर फळांच्या उत्पादनात घट झाल्याने होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र, याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत ईटीव्ही भारतने उपराजधानी नागपूरच्या कळमना बाजारसमितीमधून आढावा घेतला आहे.
नागपूरची फळबाजाराची ओळख ही संत्रा मार्केट म्हणून आहे. नुकताच आंबिया बहारचा संत्रा संपला असून आता नवीन मृग बहारचा संत्रा बाजारात यायला सुरुवात झाली आहे. मृग बहारत येणाऱ्या संत्र्यांचे उत्पादन यंदा निसर्गाच्या लहरीपनाचा फटका बसल्याने घटले आहे. त्या तुलनेत आंबिया बहार उत्पादन चांगले राहिले पण भाव पडले असल्याने नुकसान मात्र शेतकऱ्यांचेच झाले. आता मृग बहारात मोजक्याच शेतकऱ्यांकडे संत्रा उपलब्ध आहे. तोही अल्प प्रमाणात म्हणजेच 10 ते 20 टक्के उत्पादन शिल्लक आहे. याचा काही मोजक्या शेतकऱ्यांना फायदा तर बहुताश शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
वातावरणाचा मृग बहारवर झाला परिणाम-
संत्रा पिकाला मागील वर्षीच्या पावसाचा फटका बसला आहे. यात सततच्या पावसाने फुले येण्याच्या काळात पानांची वाढ झाली, परिणामी फुलेच नसल्याने संत्र्याची फळ धारणा कमी प्रमाणात झाली. काही प्रमाणात फुले बहरली मात्र, फळधारणा होण्याआधीच आणि काही अशी लहान फळे असतानाचा अवकाळी पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे ने पुन्हा संत्रा फळाची गळती झाली. या सगळ्या अस्मानी संकटात जो संत्रा वाचला तो आता बाजारात यायला सुरुवात झाली आहे. यात 3 हजार 122 टन हा फेब्रुवारी महिन्यात विक्रीस आला असून यात काही अंबिया बहाराचा तर काही मृग बहारचा संत्रा आहे.
2020 मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपूर्वी डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात जवळपास 24 हजार 776 टन संत्रा बाजारात आला होता. यापैकी एकट्या फेब्रुवारी महिन्यात 18 हजार टन संत्रा बाजारात आला होता. यंदा मात्र तब्बल 3 हजार 122 टन संत्रा बाजारात आला आहे. यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत मोठी घट आकडेवारीतून पाहायला मिळत आहे.
द्राक्ष आणि डाळिंब बागांनाही फटका; पण भाव तेजीत -
अवकाळी पावसाचा फटका बसला असला तरही डाळिंब, द्राक्षे पिकाला मिळणारा भाव सध्या तेजीत आहे. पण मराठवड्यातही अवकाळी पावसाने फळ बागांचे नुकसान झाले आहे. यामुळे मागील वर्षात डाळिंबाला 30ते 40 रुपये दर मिळाला होता. मात्र, यंदा अवकाळीच्या फटक्यामुळे उत्पादनात घट होऊन भाववाढ तेजीत झाली आहे. सध्या 80 रुपयांपासून 140 रुपये दराने म्हणजेच दुपटीने दरवाढ मिळत आहे. तेच द्राक्षांच्या बाबतीतही झाले आहे. 40 ते 60 दरम्यान असणारी द्राक्षेही 80 ते 120 रुपये किलोने विकली जात आहेत. तसेच चिक्कू सफरचंदाचेही दर तेजीत आहेत. यंदा सफरचंदाचे भाव 140 ते 170 प्रति किलो पर्यंत जाऊन पोहोचले आहेत.
कोरोनामुळे ग्राहकांच्या क्रय शक्तीवर परिणाम
कोरोनाचे सावट अद्याप हटले नाही. बाजारपेठेवर कोरोनाचा परिणाम झाला नसल्याचे म्हटले जात असले तरी सर्व सामान्य जनता कोरोनाच्या सावटातून अजून सावरलेली नाही. आर्थिक अडचणीतून जाताना ग्राहक हा किरकोळ व्यावसायिकांकडे फारसा वळता दिसून येत नाही. यामुळे फळ खरेदी असो अथवा थंडीचे प्रमाण अद्याप कमी न झाल्याने फळांचा रस पिणाऱ्यांची संख्या असो ती म्हणावी तशी वाढलेली नाही. परिणामी बाजारपेठेतील फळांच्या मागणीमध्ये तेजी आलेली नाही. दरम्यान कोरोनाच्या काळातही संत्र्याला पसंती मिळाली आहे. डाळींब पिकाची जानेवारीत 2020 मध्ये 3 हजार टन आवक होती. तेच फेब्रुवारीत 1 हजार 953 इतकी आवक झाली. यंदा आवक घटली असून जानेवारी 702 टन आणि फेब्रुवारीत 438 टन आवक नोंद झाली आहे.
शेतकऱ्यांच्या अपेक्षेचे काय....
भाव तेजीत असो वा नसो, उत्पादक जास्त झाले तर भाव कमी होतो. भाव जास्त असले की उत्पादन कमी होते. यामुळे याचा फटका सर्वसमान्य शेतकरी वर्गाला बसतच आहे. यंदा अंबियात संत्र्याला 5 ते 15 रुपये किलोला दर मिळाला. तर मृग बहारात उत्पन्न कमी आहे. मात्र, जर भाव 50 ते 60 रुपये किलो मिळाला तर झालेली तूट भरपाई मिळले, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पण सध्या 30 ते 45 रुपयाच्या घरात दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरी निराशाच आहे.