नागपूर : नागपूरच्या गोरेवाडा प्राणी उद्यानातून चार वाघ आणि चार बिबट गुजरातच्या जामनगर येथील खासगी प्राणी संग्रहालयात रवाना करण्यात आले आहे. वाघ आणि बिबट खासगी प्राणी संग्रहालयाला देण्याला वन्यजीव प्रमींनी विरोध केला आहे. गोरेवाडा प्रकल्पाची क्षमता नाही की, वन्यजीवांच्या खासगीकरणाला प्रशासन प्रोत्साहन देत आहे का? असा सवाल वन्यजीव प्रेमींनी उपस्थित केला आहे.
केंद्रीय प्राणिसंग्रहायलाय प्राधिकरणाची परवानगी: गुजरातच्या जामनगर येथे रिलायन्सचा खासगी प्राणी संग्रहालय उभारण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी खासगी प्राणी संग्रहालयाचे काही अधिकारी गोरेवाडा येथे आले होते. तेथे त्यांनी वाघ आणि बिबट्यांची निवड केली. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच केंद्रीय प्राणि संग्रहायलाय प्राधिकरणाने त्यांना गोरेवाडा येथून वाघ-बिबट नेण्याची परवानगी दिली.
अवघ्या काही दिवसात पूर्ण झाली प्रक्रिया : वन्यप्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्याच्या परवानगी देण्यासाठी कधी-कधी काही महिने लागतात. मात्र, या प्रकरणात प्राधिकरणाने काही दिवसातच परवानगीची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गोरेवाडा प्रकल्पात आंतराराष्ट्रीय दर्जाची सुविधा असताना प्रशासन गुपचूप रित्या वन्यजीवांना खासगी हातात का सोपवीत आहे? असा प्रश्न वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला आहे.
वाघ,बिबट हिंसक की षड्यंत्र : काही महिन्यांपूर्वी गडचिरोलीमधून सुद्धा हत्ती रिलायन्सच्या खासगी प्राणी संग्रहालयात पाठ्वण्यात आले होते. त्यानंतर आता नागपुर येथील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातून चार वाघ आणि चार बिबट पाठ्वण्यात आले आहे आहेत. नरभक्षक, हल्लेखोर असण्याच्या नावाखाली सध्या महाराष्ट्रात वाघ, बिबट्यांची धरपकड सुरु आहे. ही धरपकड गुजरातसाठीच तर नाही ना अशी शंकाही वन्यजीवप्रेमी उपस्थित करीत आहेत.
वन्य प्रेमी आक्रमक : अतिशय गुपचूप पद्धतीने बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातून चार वाघ आणि चार बिबट जामनगर येथील खासगी प्राणी संग्रहालयात रवाना करण्यात आले आहे, त्यामुळे नागपुरातील वन्य प्राणी प्रेमी आक्रमक झाले असून सर्व प्राण्यांना परत घेऊन यावे, या मागणीसाठी आंदोलन केले जाणार आहेत.