नागपूर Ek Dhaga Rama Sathi : अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठानेला अवघे ५ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळं संपूर्ण भारतात उत्साह आणि नवचैतन्याने भरलेल्या वातावरणाची निर्मिती झाली आहे. पाचशे वर्षानंतर श्रीरामाचं आगमन होणार आहे. त्यामुळं ज्यांची राममध्ये आस्था आहे, अश्या प्रत्येक भारतीयाला या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार व्हायचं आहे. ५०० वर्षांपेक्षा अधिक काळाचा वनवास संपवून आलेल्या श्री रामाला काहीतरी द्यायचं आहे ही भावना तयार होत आहे. भारतीयांच्या मनातील इच्छेचा ठाव घेत भारतीय जनता पक्षाच्या महानगर विणकर आघाडीकडून (Vinkar Aghadi) 'एक धागा रामसाठी' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून श्रीराम यांच्यासाठी दोन शॉल रुपी कापड विणले जात आहे. या कापडांपासून श्रीरामासाठी कापड शिवले जाणार आहेत. १९ जानेवारीला एकूण १४ मीटर लांबीच्या दोन शॉल तयार होतील, त्यापैकी एक शॉल अयोध्येतील रामलल्लासाठी पाठवण्यात येईल तर दुसरी शॉल नागपूरच्या पोद्दरेश्वर राम मंदिरातील रामाला अर्पण केली जाणार आहे.
'एक धागा राम का' हा उपक्रम : प्रभू श्रीरामात प्रत्येकाला आस्था आहे. त्यामुळं २२ जानेवारीला ज्यावेळी रामलल्ला अयोध्येत विराजमान होतील, त्यावेळी संपूर्ण देशभरात जणू दिवाळीचं साजरी होईल अश्या प्रकारचं भक्तिमय उत्साह राम प्रेमी भक्तांमध्ये दिसतोय. रामाचं आगमन होणार असल्यानं देशभरातच आत्तापासूनच जागो-जागी विविध कार्यक्रमांना सुरुवात देखील झाली आहे. त्याचं अनुषंगाने नागपूरच्या गोळीबार चौक परिसरात भारतीय जनता पक्ष विणकर आघाडीकडून 'एक धागा राम का' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
चार हजार लोकांनी विणली शॉल : १० जानेवारी पासून एक धागा श्रीरामासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला. अवघ्या सहाच दिवसात सुमारे ४ हजार लोकांनी श्रीरामासाठी शॉल रुपी कापड विणण्यात आपला सहभाग नोंदवलेला आहे. सहा दिवसात ७ मीटर पेक्षाही अधिकचा कापड विणण्यात आलाय. लोकांचा उदंड प्रतिसाद बघता पुढील काही दिवसात हे कापड तयार होईल अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केलीय.
या माध्यमातून होतेय, हँडलूमची ओळख : एक धागा श्रीरामासाठी हा उपक्रम सुरू झाला तेव्हा एक उद्देश ठेवण्यात आला होता. ज्यांना रामसाठी तयार होणाऱ्या शॉलसाठी हातभार लावायची इच्छा आहे, त्यांना हँडलूम (हातमाग) मशीनवर तो धागा वीणायचा आहे. त्यामुळं आपसूकच लोकांना हँडलूमची ओळख देखील होत आहे. जे विणकर पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय करत आहे, त्यांना देखील एकाप्रकारे ओळख मिळाली आहे. विणकारांच्या कामाला योग्य व्यासपीठ मिळत नाही त्यामुळं त्यांना हवा तो सन्मान ही मिळत नाही. अनेक पिढया विणकामात गेल्या आहे. पण नवीन पिढी या कामांमध्ये येऊ इच्छित नाहीत, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतोय.
मन जोडणारी शॉल : २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमात प्रत्येकाला जाता येणे शक्य नाही. त्यामुळं मन जोडणारे धागे विणण्याच्या उपक्रमात दररोज हजारो नागपूरकर सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवत आहेत. विविध धर्म संप्रदायाचे लोक उत्साहाने सहभागी होत आहेत.
हेही वाचा -