नागपूर - भारताचे वीर सुपुत्र अभिनंदन वर्तमान यांच्या मायदेशी परतण्याच्या आनंदात नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची एकच जल्लोष केला. यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला. तसेच देश सर्वात मजबूत हातांमध्ये असल्याच्या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा आधार घेत त्यामुळेच अभिनंदन भारतात आल्याचा दावा उपस्थित कार्यकर्त्यांनी केला.
भारताच्या वायूसेनेने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या विमानांनी २७ फेब्रुवारीला भारताच्या वायू सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना प्रत्युत्तर देताना भारताचे मिग-२१ हे विमान अपघातग्रस्त होऊन पाकिस्तानच्या सीमेत कोसळले. या घटनेत विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानच्या सैन्याने ताब्यात घेतले होते.
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्याची घोषणा केली होती. शांततेचे पाऊल म्हणून आम्ही सुटका करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. पंतप्रधान मोदींशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही, असे नमूद केले. तसेच पंतप्रधान मोदी केवळ निवडणुकांवर डोळा ठेवून युद्धाचे वातावरण तयार करत असल्याचाही आरोप इम्रान खान यांनी केला होता.