नागपूर - नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात नागपूरच्या न्यू कुर्वेज महाविद्यालयातील हर्ष गोलाईत नावाच्या अंध विद्यार्थ्याने ८२ टक्के गुण संपादित करून अंध विद्यार्थ्यांत महाराष्ट्रात दुसरा येण्याचा मान मिळवला आहे. सुरेल आवाजाचा धनी असलेल्या हर्षला प्रशासकीय सेवेत जाऊन देशसेवा करायची आहे.
हर्ष प्रभाकर गोलाईतने दहावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळवून अंध विद्यार्थ्यांत विदर्भात पहिला आणि राज्यात दुसरा येण्याचा मान मिळवला आहे. हर्षला जन्मजात दृष्टी नाही. प्री मॅच्युअर बेबी असलेल्या हर्षेने सर्व सामान्य विद्यार्थांना लाजवेल, असे यश मिळवले आहे.
हर्षच्या जीवनाची वाटचाल त्याला मिळालेल्या यशाप्रमाणेच आहे. त्याचे आई-वडील छत्तीसगडच्या बिलासपूर येथे राहतात. जन्मापासूनच यशच्या जीवनात अंधार असला तरी त्याचे कर्तृत्व डोळसांच्या अंगी देखील नाही. डोळ्याने दिसत नाही म्हणून त्याचा बाऊ करण्यापेक्षा त्या कामजोरीला आपली शक्ती म्हणून विकसित करण्याची किमया हर्षने करवून दाखवली आहे.
हर्षने सुरुवातीचे शिक्षण दिल्लीत घेतले, पण तेथील हवामान मानवत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शिक्षणासाठी नागपूरच्या अंध विद्यालयात प्रवेश मिळवून दिला. तेथे शिक्षण घेताना त्याच्या असाधारण प्रतिभेमुळे त्याला कुर्वेज न्यू मॉडेल विद्यालय आणि ज्युनिअर महाविद्यालयात प्रवेश मिळाला. या शाळेत अंध विद्यार्थ्यांच्या विशेष शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. येथे प्रवेश मिळताच हर्षच्या कर्तृत्वाला नवी दिशाच मिळाली. प्रत्येक वर्षाला हर्षच्या टक्केवारीत वाढ होतच राहिली. अखेर दहावीच्या परीक्षेत हर्षने 82 टक्के गुण संपादित करून यशाचे मोठे शिखर गाठले आहे.