नागपूर - महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना हे ओबीसींच्या राजकीय आरक्षण विरोधी असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी केले. यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी आरक्षण विरोधी झारीतील शुक्राचार्य असल्याचे आता स्पष्ट झाल्याचा आरोप भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते नागपुरात बोलत होते. तसेच काँग्रेसला ओबीसी मिलिटरी सरकारला मदत करायची नसेल, तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असेही यावेळी बावनकुळे यांनी सांगितले.
'...तर आतापर्यंत इंपेरिकल डाटा तयार झाला असता'
काँग्रेस पक्षाचे आमदार वंजारी यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर केलेला आरोप खरा आहे. मागील दीड वर्षात ज्या पद्धतीने सरकारमध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला धरून घोळ सुरू आहे यावरून ते स्पष्ट होते. तसेच न्यायालयात योग्यरित्या बाजू मांडली गेली असती तर ही वेळ आली नसती. यासोबतच मार्च महिन्यात उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आतापर्यंत इंपेरिकल डेटा तयार झाला असता. पण त्यांना ते करायचे नाही. यामुळे काँग्रेसने ओबीसी विरोधी पक्षाला सत्तेत राहून मदत न करता सत्तेतून बाहेर पडावे, अशी सूचना भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
'ओबीसी समाजाचा फुटबॉल करू नका'
राज्य मागासवर्गीय आयोगाने राज्यात ओबीसींची जातीनुसार जनगणना करण्याच्या हालचाली सुरु केलेल्या आहे. सरकारने इंपेरिकल डाटा गोळा करावा. पण ओबीसी समाजाचा फुटबॅाल करु नये. डिसेंबरपर्यंत इंपेरिकल डाटा गोळाकरुन ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारला केली. जर असे झाले नाही तर राज्यभर ओबीसी जनता रस्त्यावर उतरले, पण 2022 च्या निवडणुका ओबीसींच्या राजकीय आरक्षणा शिवाय होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
'ओबीसींचा तारणहार हा कॉंग्रेस पक्षच'
ओबीसी आरक्षणासंदर्भात शिवसेनेची भूमिका ही संदिग्ध असून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट असून ते ओबीसी सोबत नाही. ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची वागणूक आहे, त्यांच्या ओबीसींबद्दल सद्भावना राहू शकत नसल्याने ते ओबीसीच्या राजकीय आरक्षण विरोधात आहे, असे विधान काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी केले आहे. चंद्रपुरात काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपा पक्षाने सुद्धा मागील सात वर्षात ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले असून कॉंग्रेस पक्ष हाच ओबीसीचा तारणहार आहे, असेही अभिजित वंजारी म्हणाले.