नागपूर - कोरोना रुग्ण आढळल्यामुळे नागपुरातील भालदारपुरा परिसर सील करण्यात आला आहे. या अगोदरही कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे नागपुरातील नऊ ठिकाणं सील करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी चार कन्टेंनमेंट झोनमध्ये नंतर एकही रुग्ण पुढे न आल्याने तेथील प्रतिबंध उठवण्यात आले होते. आता भालदारपुराची भर पडल्याने नागपुरात 6 कन्टेंनमेंट झोन झाले आहेत. महानगरपालिकेने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.
भालदारपुरा हा परिसर नागपुरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मोमीनपुरा परिसराला लागून आहे. या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढल्याने, त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये यासाठी भालदारपुरा परिसर सील करण्यात आला आहे. या भागात येणारे आणि जाणारे सर्व मार्ग तत्काळ बंद करून या भागाच्या सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहेत. जीवनावश्यक सामानाचा पुरवठा प्रशासनाकडून केला जाणार आहे.