नागपूर - परवानगी न घेता माथी चंदनाचा टिळा लावल्याचा राग मनात धरून एका माथेफिरुने वृद्धावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी हल्ला करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. जखमी वृद्धाला रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
नागपुरात गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचा सार्वजनिक ठिकाणी दादागिरीचा प्रकार आज (सोमवार) सकाळी धरमपेठच्या कॉफी हाऊस चौकाजवळ पाहायला मिळाला. धरमपेठ येथे असलेल्या बाजारात एक वृद्ध व्यक्ती लोकांच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावून २ रुपये दक्षिणा मागत फिरत होता. यावेळी आरोपीने तू न विचारता चंदनाचा टिळा का लावला? या कारणावरून त्याच्यावर सपासप वार केले.
तो माथेफिरू एवढ्यावर न थांबता त्या वृद्धाला जबर मारहाण केली. भर बाजारात वृद्धाला होत असलेली मारहाण बघून काही लोक तिथे जमा झाले. लोकांनी त्यांनी तू का मारले असे विचारले असता, त्या मुजोर गुंडाने चक्क लोकांनाच धमकी दिली. पोलीस माझे काहीही वाकडे करू शकत नाही, असे म्हणत तो माथेफिरू तिथून निघून गेला, त्यानंतर बाजारातील लोकांनी त्या वृद्धाला रुग्णालयात दाखल करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लागलीच त्या गुंडाचा शोध सुरू केला असून सध्या त्या वृद्धाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.