नागपूर - एनटीपीसी वीज प्रकल्प मौदा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका वीज कामगाराचा मशीनमध्ये अ़डकून मृत्यू झाला असल्याची घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती इतर कामगारांनी दिली. अधिकाऱ्यांना जबाबदार धरत कामगारांनी घोषणाबाजी केल्यानंतर कामगारांच्या असंतोषावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
आज (शुक्रवार) पहाटे ५ वाजता मौदा येथील एनटीपीसी वीज प्रकल्पात कामगार अजय मोटघरे दुरुस्तीसाठी गेला होता. यावेळी अजय मशीनमध्येच अडकला. मात्र, अलार्मच वाजला नाही. अजयचा 'वैगन डेपलर' खाली चिरडून मृत्यू झाला. तो एनटीपीसीच्या एमजीआर विभागात कार्यरत होता. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मशीनमध्ये तीन दिवसांपासून बिघाड होता. त्यामुळे जेव्हा अजय मशीनमध्ये अडकला गेला त्यावेळी अलार्म वाजला नाही.
मशीनच्या दुरुस्तीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या तीन दिवसात लक्ष दिले नाही. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या रुग्णालयासमोर आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरासमोर रोष व्यक्त करत आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या घरासमोर ठेवलेल्या झाडांच्या कुंड्या फोडल्या. मृत कामगाराच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.