मुंबई - पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय सोमवारी विद्यापीठ आयोगाने(युजीसीने) घेतला आहे. या निर्णयाला युवासेनेने विरोध दर्शवला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा सक्तीने घेण्याच्या निर्णयाबाबत पुर्नविचार करावा असे, पत्र युवासेनेने केंद्रीय मानव संशोधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांना लिहिले आहे.
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत परीक्षा घेणे धोकादायक ठरेल. अनेक विद्यार्थ्यांना कँपस मुलाखतीद्वारे नोकऱया व परदेशी शिक्षणाच्या संधी मिळाल्या आहेत. जर या परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेतल्या गेल्या तर त्यांना त्या संधींना मुकावे लागेल. परीक्षांचा निकाल आणि त्यांचे पुनर्रमुल्यांकन या सगळ्या गोष्टींसाठी नोव्हेंबर ते डिसेंबर महिना उजाडेल, असे युवासेनेचे म्हणणे आहे.
आपल्याकडे ग्रामीण भागात आजही इंटरनेट उपलब्ध नाही, त्यामुळे पदवीच्या परीक्षा ऑफलाइनच घ्याव्या लागतील. त्यातून कोरोनाच्या कम्युनिटी प्रसाराचा धोका अधिक आहे. आयआयटी आणि परदेशी शिक्षण संस्थांनी त्यांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मग विद्यापीठ आयोगची अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यासाठी सक्ती का? असा सवाल देखील युवासेनेने उपस्थित केला आहे.
हा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या जीवाशी विद्यापीठ खेळत आहे. काही अनुचित घडल्यास त्याला सर्वस्व केंद्र सरकार जबाबदार असेल, असा आरोप युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केला आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भाच्या पार्श्वभूमीवर इतर वर्गांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.