मुंबई - कोरोना विषाणुचा नायनाट करण्यासाठी जगात सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. यावर औषध संशोधनासाठी जगभर शास्त्रज्ञ रिसर्च कामात अविरत गुंतलेले आहेत. अनेकजण कोरोनावर उपाययोजना म्हणून वेगवेगळे यंत्रदेखील तयार करताना पाहायला मिळत आहे. अल्ट्रा व्हॉइलेट किरणांचा कोरोनाचे विषाणू मारण्यात उपयोग होऊ शकतो. इतकेच नाही तर, सगळ्याच प्रकारचे बॅक्टेरिया आणि व्हायरस हे मारू शकणारे 'यू व्ही लायझर डिव्हाईस' तयार करण्यात मुंबईच्या एका तरुणाला यश आले आहे.
अल्ट्रा व्हायलेट किरणांचा ( U V किरण) वापर करून हे यंत्र गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरमध्ये राहणाऱ्या नीरज सावंत या तरुणाने तयार केले आहे. मात्र, यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या परवानगी व साधनांअभावी अजून याचे सॅम्पल तयार करताना अडचणी येत असल्याची खंत नीरज सावंत यांनी व्यक्त केली.
या यंत्रणाचा वापर पाणी आणि रसायनाशिवाय होणार आहे. फक्त प्लग ऑन करून हे यंत्र कार्यरत होणार आहे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांचा थेट संपर्क येत असलेल्या सरकारी व पालिका रुग्णालयात हे यंत्र उपयोगी ठरणार असल्याचे निरजचे म्हणणे आहे. या यंत्राचे सॅम्पल बनवण्यासाठी सुरुवातीला उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची मदत झाल्याचे नीरजने सांगितले. हे यंत्र मोठ्या प्रमाणात विकसित करण्यासाठी शासनाने आम्हाला आर्थिक व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नीरज सावंत यांनी केले आहे.