मुंबई: नवाब मलिक यांना ईडी कडून अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे की, यापूर्वी भ्रष्टाचार प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आता मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली आहे. तर यापुढील नंबर हा मंत्री अनिल परब यांचा असणार आहे. उद्धव ठाकरे घोटाळेबाज सरकार आहे व या सरकारमधील सर्व घोटाळे उघड केल्याशिवाय मी राहणार नाही.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची संपत्ती खरेदी केल्या प्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. या संदर्भात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ही समन्स पाठवले होते व त्या अनुषंगाने आज त्यांची कसून चौकशी करण्यात आली. ही चौकशी सुरू असताना नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जमले होते व त्यांनी तेथे जोरदार घोषणाबाजीही केल्या.