मुंबई: राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे झाल्यावर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार फोडल्याने तसेच शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर दावा केला आहे. यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. बंडखोर आमदारांचे सदस्य पद रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हा आणि संपर्क प्रमुख यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आदित्य ठाकरे हे सुध्दा मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.
यावेळी बोलताना, माझ्या प्रेमात अडकू नका, मी ब्लॅक मेल करत नाही, हे भावनिक आवाहन नाही. तुम्हाला त्यांच्या सोबत जायचे असेल तर सोबत जा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. सेना स्थापन झाली त्यावेळची वेळ आता आली आहे. मला पुन्हा नव्याने शिवसेना उभी करायची आहे. सडकी पाने गळून पडली की नवी पालवी फुटते. जिद्द असेल तर सोबत राहा नाहीतर निघून जा. ज्या भाजपाने आरोप केले आणि कूटनीती केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.