मुंबई - कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात १ एप्रिल रोजी होणारी धुळे-नंदुरबार ही स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. ही निवडणूक आता शिक्षक-पदवीधर निवडणुकीसोबत घेतली जाणार आहे. या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
५ मार्चलाच निघाली होती अधिसूचना
या पोटनिवडणुकीची ५ मार्चला अधिसूचना काढण्यात आली होती. १२ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. तर ३० मार्च रोजी मतदान होणार होते. मात्र, कोरोनामुळे ऐन मतदानाच्या तोंडावर २५ मार्चला निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस सदस्यत्वाचा व आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदार संघाची जागा रिक्त झाली होती.
१ डिसेंबरला होणार मतदान
ही पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर ती बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. दोन्ही उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली असून दोघांत सरळ सामना आहे. त्यामुळे काँग्रेसमधून भाजपात गेलेले अमरीशभाई पटेल आणि काँग्रेस उमेदवार अभिजीत पाटील यांचे भवितव्य १ डिसेंबर रोजी ठरणार आहे. निवडणूक आयेागाने जाहीर केलेल्या या कार्यक्रमानुसार शिक्षक-पदवीधर निवडणुकीसोतच म्हणजेच 1 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.