मुंबई - मुंबईमध्ये सकाळपासून समाधानकारक मतदान सुरू असले तरी मतदार याद्यांच्या घोळामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. उत्तर मध्य मतदार संघतल्या वांद्रे पूर्व भागत अनेकांची नावे मतदारयादीत नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही.
वांद्रे पूर्व येथे अनेक भागात पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. शेकडो लोक या भागातून स्थलांतरित झाले असून त्यांचे वास्तव्य मुंबईतच असले तरी त्यांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्यात आली आहे. बँकेत नोकरी करणाऱ्या टी. सोनाली आपल्या ८३ वर्षाच्या आईसह वांद्रे पूर्व येथे मतदानासाठी आल्या होत्या, मात्र मतदार यादीत त्यांचे नाव नसल्याने त्यांची निराशा झाली. सोनाली या भागात एमआयजी इमारतीत राहत होत्या. मात्र गेल्या एक वर्षांपासून त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास होत असल्याने, संपूर्ण इमारतीतील लोकांचे नाव मतदार यादीतून काढून टाकले आल्याचा आरोप त्यांनी केला.
आम्ही पुन्हा याच भागात राहायला येणार असल्याने आमची नावे रद्द करण्याचे काहीच कारण नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीत नावे नसली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत आमची नवे येण्यासाठी आयोगाशी संपर्क करणार असल्याचे त्यांनी सांगितले.