मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज (मंगळवार) बारा मुद्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणून मराठा आरक्षण मुद्द्याकडे पाहिले जात होते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha Reservation )रद्द केल्यानंतर घटनात्मक आणि सामाजिक पेच महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी राज्य सरकारकडून कायदेशीर पावले तर उचलली जात आहेत. या सोबतच राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी या मुद्द्यांमध्ये लक्ष घालून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी भूमिका राज्य सरकारने वेळोवेळी मांडली. मात्र पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण मुद्द्याला अधिक महत्त्व न देता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला अधिक महत्त्व दिले, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी केला आहे.
12 मुद्द्यांवर चर्चा
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असलेले शिष्टमंडळ यांच्या भेटीत 12 मुद्द्यांवर चर्चा झाली. तरी मुख्य मुद्दा हा ओबीसी आरक्षणाचा होता. मराठा आरक्षण मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा रेटला नसल्याचे मत वीरेंद्र पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधानांची भेट घेतली असली तरी, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाचे समाधान होणार नाही, असे वीरेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे.