मुंबई Vinayak Raut Reaction : ठाकरे यांनी मोदी यांना पंधरा दिवसात आपण भाजापसोबत सरकार स्थापन करू, असा शब्द दिला होता. मात्र, त्यांनी तो पाळला नाही, अशी साक्ष केसरकर यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर नोंदवली या पार्श्वभूमीवर राऊत यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. शिवसेना आणि भाजपा युतीचे सरकार स्थापन करण्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीनंतर महाविकास आघाडी सरकार बरखास्त करून पंधरा दिवसात युतीची पुनर्स्थापना करून सरकार स्थापन करण्यात येईल असं ठाकरे यांनी मोदी यांना सांगितलं होतं. ठाकरे यांनी भाजपासोबत सरकार स्थापन करण्याचं आश्वासन दिल्यामुळंच आपण महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद स्वीकारलं, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभा अध्यक्षांसमोर साक्ष नोंदवताना केला.
उद्धव ठाकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट : आमदार अपात्रता सुनावणी दरम्यान उदय सामंत आणि दीपक केसरकर यांची उलट तपासणी ठाकरे गटाच्या वकिलांकडून करण्यात आली. सुनावणी दरम्यान भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन करण्याची आधीपासूनच बोलणी सुरू होती, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे आणि मंत्री उदय सामंत यांनी दिली. तर उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पंधरा दिवसातच सरकार बरखास्त करून पुन्हा युतीची स्थापना करण्याबाबतचा शब्द ठाकरे यांनी दिला होता. त्या संदर्भातला निरोप आपण स्वतः मोदी यांच्यापर्यंत पोहोचवला होता असंही केसरकर यांनी सांगितलं. दरम्यान शिवसेनेच्या घटनेमध्ये पक्षप्रमुख असे कोणतेही पद अस्तित्वात नाही, केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत असलेला आदर म्हणून त्यांना पक्षाच्या घटनेत पक्षप्रमुख पद नसतानाही पक्षप्रमुख म्हणत होतो, असंही सामंत आणि केसरकर यांनी सांगितलंय.
केसरकर, सामंतांचा दावा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा : या संदर्भात शिवसेनेचे खासदार विनायक राऊत म्हणाले की, या गद्दारांच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा? मंत्री दीपक केसरकर आणि सामंत यांची वक्तव्यं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. आम्ही आता महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत आणि आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून ताकदीने लढवणार आहोत.
हेही वाचा -