मुंबई - डबेवाला भवनची जागा दक्षिण मुंबईत असावी, अशी डबेवाल्यांची मागणी आहे. महापालिकेच्या वतीने इतर जागा भवनासाठी सुचवण्यात आल्या आहेत. मात्र, त्या डबेवाल्यांच्या पसंतीस उतरल्या नाहीत. त्यामुळे जागेचा तिढा आता उद्धव ठाकरेंनीच सोडवावा, अशी अपेक्षा डबेवाला असोशिएशनने व्यक्त केली आहे.
मुंबईचे डबेवाल्यांना दररोज विदेशी पर्यटक भेट देतात. पण, पर्यटकांना भेटण्यासाठी स्वतंत्र जागा नाही. त्यांना फुटपाथवरच भेटावे लागते. मुंबईत डबेवाला भवन बांधण्यात येईल, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी सभागृहात भवनाचा प्रस्ताव मांडला.
डबेवाला भवनचा मार्ग मोकळा झाला असला तरी जागेचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. महापालिकेच्या वतीने १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पण, जागा निश्चित न झाल्याने डबेवाल्यांनी उद्धव ठाकरेंनाच हा प्रश्न सोडवण्याची गळ घातली आहे.
कसे असेल डबेवाला भवन
डबेवाल्यांच्या १२५ वर्षांच्या इतिहासाची सचित्र माहिती देणारे एक स्वतंत्र दालन यात असेल. हे दालन सर्वांसाठी खुले असेल. या ठिकाणी पर्यटक भेट देऊ शकतात. त्यामुळे दालन बनविताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा अशी डबेवाल्यांची मागणी आहे.