मुंबई Uddhav Thackeray On Nanded Death Case : राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. राज्यात औषधांचा तुटवडा असल्यानं रुग्णांचा मृत्यू होत आहे. मात्र आपले मुख्यमंत्री दिल्लीत बसून नक्षलवादाचा बिमोड कसा करावा, यावर बैठका घेत आहेत, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी केला. राज्यात भ्रष्टाचाराची साथ असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
मस्तवाल खासदारावर गुन्हा दाखल झाल्यानं अधिष्ठातांवर कारवाई : नांदेड इथल्या रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी अधिष्ठातांना शौचालय साफ करायला लावलं होतं. यावर उद्धव ठाकरे यांनी मोठी टीका केली आहे. मस्तवाल खासदारावर गुन्हा दाखल झाल्यामुळे तिथल्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला का, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
आरोग्य मंत्री फक्त जाहिरातीच्या पोस्टर मध्ये दिसतील : करोना काळात महाराष्ट्र सरकारनं केलेलं काम योग्य असल्यानं जागतिक स्तरावर प्रशंसा करण्यात आली होती. मात्र आता आरोग्य मंत्री फक्त जाहिरातीच्या पोस्टरमध्ये दिसतील. यांच्याकडं औषधं खरेदी करायला पैसे नाहीत, हे फार संतापजनक आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
उपमुख्यमंत्री फोटो काढण्यात व्यस्त : गणपती दरम्यान नागपूर शहरात पूर आल्यानं नागरिकांच्या घरामध्ये पूर्ण पाणी भरलं होतं. परंतु उपमुख्यमंत्री सेलिब्रिटी बरोबर फोटो काढण्यात व्यग्र होते, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांचं सहकुटुंब सहपरिवारासह बॉलीवूडच्या तारकांना बोलवून त्यांच्याबरोबर फोटो काढत होते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
माझा पक्ष चोरणाऱ्यांनी नांदेडला जावं : नांदेडमधील रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. मात्र अद्यापही या रुग्णालयात राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरकले नाहीत. माझा पक्ष आणि चिन्ह चोरणाऱ्यांनी नांदेडला जावं, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला. मला राष्ट्रवादी पक्षाबद्दल काही बोलायचं नाही, फक्त महाराष्ट्राच्या आरोग्यवस्थेबाबत बोलायचं आहे. सरकारमध्ये फक्त हाणामाऱ्या सुरू आहेत, जनतेसाठी काहीच नाही. नांदेड रुग्णालयाच्या डीनला टॉयलेट साफ करायला लावलं. वरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
तर डॉक्टरांवर ताण वाढेल : डॉक्टरांना विश्वासात घ्या, तिथली वस्तुस्थिती समजून घ्या. औषधांच्या पुरवठ्याची काय परिस्थिती आहे. पावसाळ्यापूर्वी अनेक ग्रामीण ठिकाणी औषधांचा साठा पुरवावा लागतो, तशी व्यवस्था करावी लागते. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी रुग्णालयात जाऊन आढावा घेण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
अजित पवार माझ्यासोबत नाराज नव्हते : अजित पवार माझ्यासोबत असताना कुठल्याही पद्धतीनं नाराज नव्हते. उलट ते चांगलं काम करत होते. म्हणून तेव्हा ज्यांच्या पोटात ते दुखत होतं. ते नाराज झाले होते. आज अजित पवार त्यांच्या उरावर बसले आहेत, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
सगळे घोटाळे बाहेर काढा : मुंबई महापालिकेत घोटाळा झाला असेल, तर ठाणे, कल्याण, पिंपरी चिंचवडपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व घोटाळे बाहेर काढा, असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. सरकारच्या विविध योजना आहेत मग त्या योजना गेल्या कुठे? कुणी कितीही काही म्हटलं तरी अनुभव हा सर्वात मोठा गुरू असतो. अनुभव जनता घेत आहे व या निवडणुकीत त्यांना फटका दिल्याशिवाय जनता शांत राहणार नाही, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
हेही वाचा :