मुंबई - आदिवासी समाज आणि वंचित घटकांना सरकारच्या आधाराची गरज आहे. त्यांना अजूनही काही प्रमाणपत्र मिळवणे अवघड जाते. त्या घटकांना सीएए आणि एनपीआरच्या माध्यमाने प्रमाणपत्र विचारल्यास त्रास होऊ शकतो. यामुळे सरकार त्यांच्या मागे उभे राहिल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
स्वातंत्र्य लढ्यात आदिवासींचा सहभाग होता. अजूनही या आदिवासींकडे जमिनींबद्दल, मुलभूत गरजांबद्दल आवश्यक ते लक्ष दिले गेले नाही. या घटकला जातपडताळणीसह अन्य कागदपत्र मिळवणे कठिण जाते. या स्थितीत जर त्यांना सीएए, एनआरसी आणि एनपीआरसाठी प्रमाणपत्राची मागणी झाल्यास त्या आदिवासींचे अस्तित्वच घोक्यात येऊ शकते. त्यांच्यापुढे स्वातंत्र्य म्हणजे काय असा प्रश्न निर्माण होईल, अशी भीतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. रोजगार, आश्रमशाळा तसेच अन्य हक्कांसाठी आदिवासींच्या पाठीशी हे सरकार उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा टोला -
सभागृहात महाआघाडी सरकार केवळ मागील सरकारच्या योजनांना स्थगिती देत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोणत्याच विकास कामांना सरकारने स्थगिती दिलेली नाही. उलट विकास कामांना गती मिळायला लागली आहे. असे सांगत त्यांनी आम्ही विकासाचे मारेकरी नाही, तर महाराष्ट्राचे प्रेमी आहोत, अशा शब्दात विरोधकांना टोला लगावला.
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्राचा 'हीरक' महोत्सव करू -
यंदा संयुक्त महाराष्ट्राचे हीरक महोत्सवी वर्षं आहे. मुंबई हे महाराष्ट्राला कोणी आंदण दिलेली नाही, तर मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली आहे. त्या गोष्टीला ६० वर्षं होत आहेत. सत्ताधारी व विरोधकांचे विचार वेगवेगळे असतील, पण आपले राज्य एक आहे. तेव्हा जगाला हेवा वाटावा असा हीरक महोत्सव साजरा करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शतायुषी व्हा म्हणाले आणि सभागृहात हास्यस्फोट -
शाळेत मराठी भाषा अनिवार्य करण्यासाठी सरकारने कायदा करताना काही त्रुटी राहिल्या आहेत. तो कायदा आणखी कडक करावा, अशी सूचना विरोधी पक्ष नेत्यांनी मांडली. त्यांच्या सूचनेचे आम्ही स्वागत करतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्याचबरोबर सरकारला १०० दिवस पूर्ण होत आले आहेत. या दिवसात विरोधी पक्षाचे सहकार्य मिळाले आहे. असेच सहकार्य आणखी ५-५० वर्षं मिळत राहो. तुम्ही शतायुषी व्हा.., असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले तेव्हा सभागृहात एकच हास्यस्फोट झाला.
महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची व्याप्ती वाढवू -
महाआघाडी सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली आहे. पुढच्या काही दिवसात दुसरी यादी जाहीर करू, असे ठाकरे यांनी सांगितलं. काही महत्वाच्या सूचनाही आल्या असून लवकरच या योजनेची व्याप्ती वाढवू, असेही त्यांनी सांगितलं. सभागृहात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचाही उल्लेख यावेळी करण्यात आला.