मुंबई - आजच दृश्य हे वेगळे आहे. कारण सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि इतर पक्ष एकत्र येऊन आपल्या आईचा सन्मान (मराठी भाषा) करत असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार करणारी माँ जिजाऊंची भाषा म्हणजे मराठी आहे. मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांनी दुष्मनांचे धाबे दणाणत होते. त्यामुळे मराठी भाषा संपवण्याची कोणाची 'टाप' होणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मराठी भाषा ही भक्ती आणि शक्तीची भाषा असल्याचेही ते म्हणाले.
'हे' भाग्य मला लाभलं
आपल्या मातृभाषेचा अभिमान स्वाभिमान टिकवण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. संत ज्ञानेश्वर, बहिणाबाईंनी संत तुकाराम, यांनी मराठी भाषा समृद्ध केली. मराठी भाषा अनिवार्य करण्याचे भाग्य माझ्या कार्यकाळात झाले, याचा मला अभिमान असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
आता वासुदेव गेला, गोंधळी गेले, हे सगळ लुप्त झाले आहे. हे मराठी भाषेचे दृश्य स्वरूप आहे, ते जपले पाहिजे असेही मुख्यमंत्री म्हणाले. मराठी संपवण्यासाठी मुघल आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले पण कोणाची माय व्याली नाही, तिला कोणी संपवू शकणार नाही, असे सडतोड वक्तव्य यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
भाषा ही संस्कारातून येत असते. ती भाषा राजभाषा झालीच पाहिजे. कारण ते भाग्य मला लाभले. आता माणूस मोबाईलवेडा झाला असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. इंग्रजांना ठणकावणारी लोकमान्य टिळकांची भाषासुद्धा मराठीच होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टोला लगावला. गोंधळी बाहेरच बरे कारण, ते आत आले तर आम्ही काय करणार? असे म्हणत सभागृहात गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना टोला लगावला. या भाषेचा ठेवा जपण्याचे काम आपण करणे गरजेचे आहे.
मातृभाषा संपवण्याची कोणाची हिंमत नाही. कारण ती दगडावर, हृदयावर, डोंगरावर कोरल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रीमंडळातील इतर मंत्री, आमदार आणि विद्यार्थी उपस्थित होते.