मुंबई- पाच वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बोरीवली परिसरातील एका सामाजिक कार्यकर्त्याचे अपहरण करून, त्याला दारू पाजून, कळवा खाडी पुलावरून खाडीत फेकून देण्यात आले. याप्रकरणी 2 आरोपींना युनिट 11 ने अटक केली आहे. मनीष हर्षे (49, राहणार बोरीवली) असे या सामाजिक कार्यकर्त्याचे नाव आहे. मनीषचे तो राहत असलेल्या इमारतीच्या गेटवरून अपहरण करण्यात आले होते. अपहरण झालेल्या व्यक्तीची पत्नी ही दिल्लीत एका बँकेत उच्च पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
पाच वर्षांपूर्वी झाले होते भांडण -
मंगळवारी मनीष हर्षे हे त्यांच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ गप्पा मारत असताना त्यांच्याच परिचयातले दोन जण हे रिक्षातून आल्यानंतर त्या दोघांमध्ये शुल्लक कारणावरून भांडण झाले होते. काही वर्षांपूर्वी मनीष यांच्याकडून या दोन तरुणांना मारहाण झाली होती. मात्र, त्यानंतरही हे दोन आरोपी व मनीष हर्षे एकमेकांच्या संपर्कात होते. दरम्यान मंगळवारी झालेल्या भांडणाचे कारण पुढे करून या दोघांनी मनीषला इमारतीच्या गेट वरूनच अपहरण करून, जबरदस्ती रिक्षात बसवून कळवा खाडी पुलावरून फेकून दिले होते. यानंतर या संदर्भात मनीषच्या पत्नीकडून बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
अपहरण करून कळवा खाडी पुलावरून दिले फेकून -
याप्रकरणी क्राईम युनिट 11 कडून तपास केला जात आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी महेश कुटे (29) व दिनेश मेहरा (36) या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला असून मनीष हर्षे यांना कळवा खाडी पुलावरून खाली फेकून दिल्याची त्यांनी कबुली दिली आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मनीष यांचा शोध सुरू आहे.
औरंगाबादेत हवेत गोळीबार करून ठेकेदाराचे फिल्मी स्टाईल अपहरण -
औरंगाबाद शहरातील देवानगरी येथे हवेत गोळीबार करून एका ठेकेदाराचे अपहरण केल्याची घटना ४ नोव्हेंबरला घडली होती. पांढऱ्या रंगाच्या गाडीत आलेल्या लोकांनी या ठेकेदाराचे अपहरण केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. नाजीम पठाण राउफ पठाण असे अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकांचे नाव आहे. बँकेत नोकरी करणाऱ्या मदन अवधूत भोसले यांच्या घराच्या बांधकामचा ठेका पठाण यांनी घेतला होता. ४ नोव्हेंबरला सकाळी ते साईटवर सकाळी आले आणि कामगारांकडून बांधकामाची माहिती घेत असताना अचानक एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून तीन ते चार व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी पठाण यांच्याशी हस्तांदोलन केले आणि त्याचवेळी धक्कादेत पठाण यांना गाडीमध्ये ढकलत नेले. त्यावेळी त्यांनी इतर कोणी नागरीक जवळ येऊ नये म्हणून हवेत गोळीबारही केला आणि पठाण यांचे अपहरण केले.