मुंबई - नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोकडून बॉलिवूड ड्रग्स सिंडिकेट प्रकरणी तपास केला जात आहे. आतापर्यंत बॉलिवूडमधील नामवंत अभिनेता, अभिनेत्रीसह वेगवेगळ्या व्यक्तींची चौकशी करण्यात आली असून अनेक अमली पदार्थ तस्करांना अटक केलेली आहे. अशा प्रकारच्या कारवाईमध्ये नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोकडून 19 जानेवारी रोजी मुंबईतील जे जे रुग्णालय जवळ करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान मुंबई अग्निशमन दलाच्या संदीप गणपत चव्हाण या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार मोहम्मद नाझिम खान याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींकडून 65 ग्राम मेफेड्रोन (एमडी) हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
आरोपीने गिळल्या होत्या 12 कोकेन कॅप्सूल -
14 जानेवारी रोजी जुहू या ठिकाणी एका नायजेरियन नागरिकत्त्व असलेल्या इफियुचुकू पीयूस हा अमली पदार्थ तस्कर संशयास्पदरीत्या पंचतारांकित हॉटेलच्या आजूबाजूला फिरताना एनसीबीच्या अधिकाऱ्यांना आढळून आला. या आरोपीला अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असता, त्याच्या जवळील असलेले कॅप्सूल आरोपीने गिळून टाकले. आरोपींनी गिळलेल्या कॅप्सूलमध्ये प्रत्येकी 1 ग्राम कोकेन असल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ या आरोपीला एनसीबीने जेजे रुग्णालयमध्ये एक्स-रे व सिटीस्कॅन करण्यासाठी नेले. या ठिकाणी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या अमली पदार्थ तस्कराने तब्बल 12 कॅप्सूल गिळल्या असल्याचे समोर आले होते. या 12 कॅप्सूलमध्ये प्रत्येकी एक ग्राम कोकेन भरण्यात आले होते. वैद्यकीय उपचारानंतर 18 जानेवारी रोजी या आरोपीला रुग्णालयातून सोडण्यात आले होते.
हेही वाचा - चर्चा तर होणारच! निवडणूक जिंकल्यानंतर कारभारीला खांद्यावर घेत कारभारणीने काढली मिरवणूक