मुंबई - चेंबूर नाका येथील म्हाडा कॉलनीमध्ये निर्माणाधीन ड्रेनेज लाईनमध्ये वाळूने भरलेला टिप्पर घुसल्याची घटना घडली आहे. ट्रक पाठीमागे घेत असताना ही घटना घडली आहे. ड्रेनेज लाईन खचून एक महिला, एक मुलगा आणि मुलगी जखमी आहेत. अरुणा रमेश मानकर (४५) व त्यांची मुलगी मरीयम या दोघी ड्रेनेजमध्ये अडकल्या होत्या. त्यांच्यावर सायन व राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे.
आरएफसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागा बाबा दर्गा, म्हाडा कॉलनी येथे ही घटना घडली आहे. जखमी हे निर्मानधीन ड्रेनेजच्या ठिकाणी काम करत असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नागरिकांनी व अग्निशामक दलाच्या जवानांनी टँकमध्ये अडकलेल्या लोकांना तात्काळ बाहेर काढले आहे. जागा दलदलीची असल्याने खचण्याच्या भीतीने पोलीसांनी नागरिकांना याठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.
यावेळी स्थानिक नागरिक जावेद खान यांनी सांगितले की, हे बांधकाम अवैधरित्या चालू असून या जागेवर परिसरातील इमारतीचे सेफ्टी टँक आहे. त्यावरच बांधकाम सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी घटनास्थळी भेट दिली. या कामाची चौकशी झाली पाहिजे व दोषींवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.