मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाच्या सुनावणीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी माहिती देत सांगितले की, 2013 मध्ये झालेल्या नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास येत्या दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दाभोलकर खूनप्रकरणी आरोपीने जामीनासाठी दाखल केलेल्या याचिकेला सीबीआयने विरोध केला आहे. आरोपी वीरेंद्रसिंह तावडे याने खटल्याला विलंब झाल्याच्या कारणावरून जामीन मागितला होता. 2016 मध्ये त्याला खूनप्रकरणी अटक करण्यात आली होती.
सीबीआयच्या वकीलांची माहिती : सीबीआयचे वकील संदेश पाटील यांनी सीबीआयचे न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती पी डी नाईक यांच्या खंडपीठासमोर सांगितले की, पुण्यातील ट्रायल कोर्टाने आतापर्यंत १५ साक्षीदार तपासले आहेत. यापैकी फक्त सात ते आठ साक्षीदार शिल्लक आहेत. मी विशेष सरकारी वकील यांच्याशी बोललो आहे. खटल्यातील सरकारी वकिलांनी सांगितले की, खटला लवकर चालवला तर दोन ते तीन महिन्यांत निकाल लावता येईल, असे पाटील यांनी सांगितले.
पुढील सुनावणी 21 फेब्रुवारीला : आधीच तपासलेल्या साक्षीदारांपैकी कोणी न्यायालयात विरोध दर्शवला का, हे खंडपीठाने जाणून घेण्याचा प्रयत्न असता संदेश पाटील यांनी नकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर न्यायालयाने आरोपी तावडे याचा वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांना आणखी काही महिने वाट पहायची इच्छा आहे का, अशी विचारणा केली. यावर आरोपीचे वकील म्हणाले की, तावडे सात वर्षांपासून तुरुंगात आहे. यामुळे तावडे यांच्या जामीन अर्जावर गुणवत्तेवर निर्णय घेण्याची आमची मागणी आहे. आरोपी तावडे याच्याविरोधात कोणताही पुरावा नसल्याचा दावा इचलकरंजीकर यांनी केला. त्यानंतर खंडपीठाने आरोपीच्या जामीन याचिकेवर २१ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली.
नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात मॉर्निंग वॉकला जात असताना दोन हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. 2014 मध्ये पुणे शहर पोलिसांकडून या प्रकरणाचा ताबा घेणाऱ्या सीबीआयने या प्रकरणातील पाच आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे. दाभोलकर हत्येप्रकरणी ऑक्टोबर 2021 मध्ये सुनावणी सुरू झाली. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद काळसकर, विक्रम भावे आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर हे या प्रकरणातील आरोपी आहेत. जामिनावर बाहेर असलेल्या पुनाळेकर याच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे. तर इतर चौघांवर खून, गुन्हेगारी कट आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कठोर तरतुदींखाली खटला चालवला जात आहे.