मुंबई - डंपरने धडक दिल्याने कामावरून परतत असलेल्या वाहतूक हवालदाराचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पश्चिम द्रुतगती मार्गावर घडली आहे. तर अन्य एक सहकारी वाहतूक पोलीस गंभीर जखमी झाला आहे. वाहतूक पोलीस नाईक पांडुरंग मारुती सकपाळ (वय 40) असे त्या अपघाती मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सकपाळ हे मुंबई दिंडोशी वाहतूक विभागात काम करत होते. तर भावेश पिवडे (वय 32) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
काही अंतरापर्यंत फरफटत नेले-
पांडुरंग मारुती सकपाळ आणि त्यांचे सहकारी भावेश पिवडे (वय 32) हे गोरेगांव एक्सप्रेस हायवेवरून मंगळवारी दुपारी ड्युटीवरून दुचाकीने परतत होते. त्यावेळी हब मॉलजवळ अंधेरीहून येणाऱ्या भरधाव डंपरने (क्रमांक एमएच-48 एजी 6570 ) डंपरने पांडुरंग मारूती सकपाळ आणि वॉर्डन भावेशला यांच्या अॅक्टिव्हा स्कूटरला धडक देऊन काही अंतरापर्यंत फरफटत नेले. त्यावेळी मारुती हे डपरच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर भावेश हे देखील गंभीर जखमी झाले.
चालक फरार-
या अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर उपस्थितांनी तातडीने दोघा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंत डॉक्टरांनी सकपाळ यांना मृत घोषित केले. तर भावेशवर उपचार सुरू करण्यात आले. भावेश यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच वनराई पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.