मुंबई - एकीकडे राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले असताना, राज्य शासनाकडून व स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, दुसरीकडे मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकावर आंतरजिल्हा रेल्वेगाडीतून प्रवास करणार्या प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग होत नसल्याची माहिती समोर येत आहे.
कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्हात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून जिल्ह्यानुसार टाळेबंदी आणि प्रवासावर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापासून विदर्भातील अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि बुलढाणा या जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. त्याच प्रमाणे मुंबईतही रुग्ण संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यांतर्गत रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग होणे आवश्यक आहे. मात्र, मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकावर आंतरजिल्हा रेल्वे गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग होत नसल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वेकडून लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या प्रवासाची स्क्रिनिंग होत आहे. ठिक-ठिकाणी पालिका बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग सुरू असल्याचा दावा करत आहे.
प्रवाशांवर रेल्वेचे नियंत्रण नाही
अनलॉक काळात मेल, एक्सप्रेस प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. यावेळी, ये-जा करण्यासाठी एकच मार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये फिजिकल डिस्टनसिंग राखून त्यांना रांगेत उभे राहून ये-जा करण्याची परवानगी देण्यात आली होती. प्रवासी रांगेतून जाताना थर्मल स्क्रिनिंग त्यांची होत होती. मात्र, आता सर्व लांब पल्ल्याच्या स्थानकावर ये-ज करण्यासाठी सर्व स्थानकांवरील दारे खुले केले आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांवर रेल्वेचे नियंत्रण दिसून येत नाही आहे.
स्थानकांवर डॉक्टरच नाही
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर बाहेर राज्यातून येणाऱ्या तीन ते चार गाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग करण्यात येते. यावेळी महानगरपालिकेचे वैद्यकीय पथकही स्थानकावर उपस्थित असते तसेच कोविड चाचणीसाठी खासगी लॅबचे कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र, या तीन-चार गाड्यांची तपासणी केल्यानंतर पालिका कर्मचारी निघून जातात. फक्त लॅब कर्मचाऱ्यांची रेल्वे स्थानकांवर दिसून येत आहे. तसेच रेल्वे स्थानकावर बसून असलेले प्रवासीही सोशल डिस्टंसिंग पालन करताना दिसून येत नाही.
सीएसएमटीवर एकच थर्मल स्क्रिनिंग
सुरूवातीला कोरोना काळात प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी आणि सोशल डिस्टंसिंग पालन करण्यासाठी रेल्वेने नियोजन केले होते. प्रवाशांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक थर्मल स्क्रिनिंग मशीन बसविण्यात आली होती. मात्र, आज याथर्मल स्क्रीनिंग मशीन एकच असल्याने या मशीनवर मोठ्या प्रमाणात ताण येतो आहे. याशिवाय मध्य रेल्वेच्या प्रमुख रेल्वे स्थानकावरील बंद केले प्रवेशद्वार पुन्हा सुरू करण्यात आल्याने प्रवासी थर्मल स्क्रीनिंग न करताच स्थानकाबाहेर पडत आहे.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा
रेल यात्री परिषदचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले की, राज्य सरकार, महापालिका, रेल्वे प्रशासन कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याला गंभीरतेने घेत नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे थर्मल स्क्रिनिंग, कोरोना चाचणी लांब पल्ल्याच्या सर्व एक्सप्रेसच्या प्रवाशांची होणे आवश्यक आहे. मात्र, प्रवाशांची तपासणी होत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात रेल्वे प्रशासन, राज्य सरकार, महापालिका खबरदारीने पाऊले उचलत नाही. कोरोना चाचणीसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. स्थानकाच्या प्रत्येक ये-जाच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंग होणे अपेक्षित आहे.
हेही वाचा - राज्यात नव्या वर्षातील आज सर्वाधिक रुग्णवाढ; अनेक ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रे
हेही वाचा - महाशिवरात्री उत्सवासंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जाहिर