मुंबई - फुकट्या प्रवाशांचा लोकलमधील वाढलेला वावर, गर्दुल्ल्यांची लोकलमधील दादागिरी आणि याकडे रेल्वे पोलिसांचे होत असलेले दुर्लक्ष, यामुळे पुन्हा एकदा आपले कर्तव्य बजावत असताना एका तिकीट तपासनीसाला (टीसी) मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. आज (दि. 2 नोव्हेंबर) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मध्य रेल्वेच्या नाहूर स्थानकावर रेल्वे प्रवाशांनी एका टीसीला बेदम चोप दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे टीसींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून रेल्वे प्रशासनाचा कारभारावर शंका व्यक्त केली जात आहे.
नाहूर रेल्वे पोलिसांकडे तक्रार
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या नाहूर स्थानकांवर मुख्य तिकीट निरीक्षक सुभाष अनंत जोशी यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी सुरू होती. यावेळी तिकीट तपासनीस संदीप चितळे यांच्यासह इतर दोन तिकीट तपासणी कर्मचारी आणि 2 आरपीएफ कर्तव्यावर होते. दरम्यान, ओव्हर ब्रिजवर एका प्रवाशाला तिकीट तपासनीस संदीप चितळे यांनी तिकीट विचारल्यास तिकीट नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर, टीसीने या प्रवाशांना दंड भरण्यास सांगत असताना तो प्रवासी पळून जात होता. त्याला पकडण्यासाठी टीसी संदीप चितळे हे देखील त्यांच्या मागे धावत होते. पाठला करताना त्या प्रवाशाचा तोल गेल्याने तो इतर प्रवाशांच्या अंगावर पडला. यात काही प्रवासी जखमीही झाले. यानंतर काही प्रवाशांनी टीसी संदीप चितळे घेराव घालून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी कसेतरी टीसी संदीप चितळे यांना सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले. तिकीट तपासनीस संदीप चितळे आणि त्यांच्या सहकार्यांनी लोहमार्ग नाहूर पोलिसांकडे याबाबत तक्रार नोंदवली असून पोलीस या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
कठोर कारवाई करणार
नाहूर स्थानकानावरील घटना खूप दुःखद आणि खेदजनक आहे. आमचे तिकीट तपासनीस त्यांचे काम करत होते. त्यामुळे तिकीट नसलेले प्रवासी पळू लागले. या धावपळीत तो जखमी झाला आणि अज्ञातांनी तिकीट तपासनीसाला मारहाण केली. त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करणार आहोत. आम्ही लोकांना सरकारच्या परवानगीनुसार तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन करतो, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
हे ही वाचा - VIDEO : जाणून घ्या.. ड्रग्ज क्रूझ प्रकरणात व्हाट्सअप चॅट ठरतात किती महत्वाचे ?