मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वे लोकलमधून सकाळी साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. रेल्वे प्रवासात महिलांची छेडछाड, मोबाईल चोरी, पाकीटमारी, विनयभंग, चोरीच्या उद्देशाने मारहाण असे अनेक गुन्हे दिवसभरात घडतात. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सर्वच लोकल ट्रेनच्या महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच टॉक बॅक यंत्रणा बसविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला होता. मात्र, अजूनही अनेक लोकल गाड्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाही. तर महिलांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटन आणि टॉक बॅक ही यंत्रणादेखील लोकलमध्ये बसवणे अर्धवट राहिले आहे.
रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे : रेल्वे यात्री या प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले की, प्रशासनाला या संदर्भात आम्ही अनेकदा निवेदन दिले आहे. रेल्वे सल्लागार समितीत हा विषय मांडला असून काही वर्षांपूर्वी संसदेची महिला सुरक्षा समिती मुंबईत आली होती. या समितीपुढे देखील महिला सुरक्षेचा प्रश्न आम्ही उपस्थित केला. मात्र, तरीही महिला डब्बांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे.काहीतरी घटना घडल्यानंतर जाग येण्याआधीच महिलांच्या सुरक्षेसाठी सक्षम पाऊल रेल्वेने उचलले पाहिजे.
आरपीएफचे तैनात करण्याची मागणी : बुधवारी धावत्या लोकलमध्ये एका तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार घटनेनंतर, लोकलच्या महिला डब्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या आधी देखील लोकल ट्रेनमध्ये महिलांसोबत असभ्यवर्तन वर्तन केलेल्या नराधमास रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ही एकच घटना नसून अशा अनेक घटना रेल्वे लोकलमध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या डब्यात होमगार्डसह रेल्वे पोलीस तसेच आरपीएफचे तैनात करण्याची मागणी महिला प्रवाशांनी वारंवार केली आहे. पण अशा प्रकारच्या घटना घडल्या की, काही दिवस महिलांच्या डब्यात सुरक्षेपर पोलीस पाहायला मिळतात. नंतर जैसे थे अशी परिस्थिती निर्माण होत असते.
टॉक बॅक यंत्रणा : मुंबईतील रेल्वे लोकलने दररोज लाखो महिला प्रवास करतात. काही महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र, ही मोहीम कासवछाप गतीने सुरु असून, अनेक महिला डब्बात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले नसल्याचे चित्र आहे. टॉक बॅक यंत्रणा दोन ते तीन लोकलमध्ये बसवली गेली आहे. सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याची मोहीम अत्यंत कमी गतीने लावली जात आहे.
इतके बसवले सीसीटीव्ही कॅमेरे : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे स्थानकात ३ हजार ४३२ सीसीटीव्ही कार्यरत आहे. तसेच रेल्वे गाड्यात १ हजार ८१० सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित आहे. विशेषत १ हजार ८१० पैकी १ हजार ३५० सीसीटीव्ही कॅमेरे लोकल ट्रेनमध्ये बसविण्यात आले आहे. यात सीमेस लोकलमध्ये २४०, मेधा लोकलमध्ये ३३२, बंबार्डियन लोकलमध्ये ७२६ आणि वातानुकूलित रेल्वे गाड्यात ७२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.
हेही वाचा -