मुंबई : देशात महागाई तसेच पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर हा मुद्दा तापलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशी बनावटीची किंमती गाडी घेतली हा विषय सध्या चर्चेत आहे. त्यावर विरोधकांनीही आक्षेप घेतला आहे. हाच धागा पकडत सामनातील रोकठोक या सदरात संजय राऊत यांनी मोदी सरकार आणि देशभरात सुरू असलेल्या सरत्या वर्षात घडलेल्या घटनांचा आढावा घेत मावळत्या वर्षातील जळमटे दुर करा खोटे बोलणाऱ्यांना घरी बसवा असे थेट आवाहन केले आहे. रोकठोक सदरातील महत्वाचे मुद्दे...
मोदींंनी त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार करू नये
महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. पंतप्रधान मोदींसाठी 12 कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी आता खरेदी केली. त्यातून सरकारची भ्रमंती चालली आहे. 2021 अनेक जळमटे तशीच ठेवून सरले आहे. तेच निर्बंध, तेच सर्व प्रश्न 2022 च्या झोळीत टाकून 2021 सरले तेव्हा लोकांनी फार मोठा जल्लोष केला असे चित्र दिसले नाही. 2020 मावळताना 2021 वर्षाला गोंधळ व अराजकाची भेट दिली. 2021 ने 2022 ला तोच नजराणा पुढे दिला. मावळते प्रत्येक वर्ष देशाला निराशा आणि अराजक देत आहे. आपले पंतप्रधान मोदी हे जगासमोर गंगास्नान करतात. म्हणून देशातल्या लोकांचे नैराश्य दूर झाले नाही किंवा कोरोना वाहून गेला नाही. तो कायम आहे. 28 डिसेंबर रोजी देशभरातील सर्व माध्यमांनी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी विकत घेतलेल्या 12 कोटी रुपयांच्या नव्या मर्सिडीज गाडीचे छायाचित्र छापले. स्वतःस फकीर म्हणवून घेणाऱ्या, प्रधान सेवक म्हणून वावरणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी परदेशी बनावटीची गाडी घेतली. पंतप्रधानांची सुरक्षा, आराम वगैरे गोष्टी महत्त्वाच्या, पण त्यापुढे आपण फकीर असल्याचा पुनरुच्चार प्रधान सेवकांनी करू नये.
तेथेही भाजपची घसरगुंडीच होईल
2020 मध्ये सुरू झालेले शेतकरी आंदोलन 2021 च्या अखेरीस संपले, पण 700 हून जास्त शेतकऱ्यांना त्यासाठी प्राण गमवावे लागले. शेतकरी आंदोलनातील काही संघटना आता पंजाब-हरयाणातील विधानसभा निवडणुकीत उतरल्या आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला आता असे वाटू लागले की, त्यांचा पक्ष सत्तेवरून कधीच खाली उतरणार नाही. तो भ्रम आहे. प. बंगालात भाजपचा दारुण पराभव झाला. नरेंद्र मोदी यांचा चेहरा व अमित शहा यांची दबंग चाणक्य नीती सर्वत्र चालतेच असे नाही हे प. बंगालने सिद्ध केले. कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुकीतही काल भाजपचा पराभव झाला. भाजपास दहा जागाही कोलकाता म्युनिसिपालिटीत जिंकता आल्या नाहीत. या निवडणुकीत भाजपची 20 टक्के मते कमी झाली. चंदिगड महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपचा टक्का घसरला. तेथे 'आप'सारख्या पक्षाने बाजी मारली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड राज्यात नव्या वर्षात विधानसभेच्या निवडणुका आहेत. तेथेही भाजपची घसरगुंडीच होईल असे स्पष्ट दिसते. 2014 साली सुरू झालेल्या भाजपच्या प्रवासाचा आलेख 2022 मध्ये खाली आलेला दिसेल, इतका रोष जनतेच्या मनात आहे.
राजकारण्यांवरील उरलासुरला विश्वासही नष्ट केला
नव्या वर्षात नवे काय होईल? हे कोणीच सांगू शकत नाही. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका आणि मुंबईसह महाराष्ट्रात 9 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल आणि 'हे सारे कशासाठी? यामधून सामान्य हिंदुस्थानी माणसाचे भवितव्य कसे सुधारणार?' असा चेहरा करून सामान्य माणूस महागाईचे ओझे खांद्यावर घेऊन आपली वाटचाल कशीबशी चालू ठेवील. राजकारण्यांवरील उरलासुरला विश्वासही 2021 सालाने नष्ट केला. कुणाचीही बाजू घेणे अशक्य व्हावे या स्थितीला नेते मंडळी गेली आहेत. केंद्र सरकारने लोकांवर रात्रीचे निर्बंध लावले त्यामुळे उद्योग, व्यवसाय, हॉटेल व्यावसायिकांचे धंदे मंदावले. पंतप्रधान मोदी यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतल्यानंतर हे निर्बंध लावले, पण उत्तर प्रदेशात स्वतः मोदी, अमित शहा हे सत्ताधारी, प्रियंका गांधी, केजरीवाल, अखिलेश यादव हे विरोधक रोज लाखालाखांच्या सभा घेतात. त्यामुळे निर्बंध फक्त सामान्य लोकांसाठी, नेते मंडळी मोकाट आहेत. यावर भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मोजक्या शब्दांत लोकांचा संताप व्यक्त केला. 'रात्री कर्फ्यू आणि सकाळी लाखोंची गर्दी बोलवायची हे कुठले निर्बंध?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मोदी हे उत्तर प्रदेशात जाहीर सभा घेतात व दिल्लीत येऊन कोरोना, ओमायक्रोनबाबत चिंता व्यक्त करतात याला निर्बंध कसे म्हणायचे? निर्बंधामुळे लोकांचा रोजगार, व्यवसाय बुडाला आहे. नवे वर्ष साजरे झाले नाही, पण त्यामुळे लाखो हॉटेल्स, कॅटरिंग, इव्हेन्टस्वाले, दुकानवाले, मंडपवाले, खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचे उत्पन्न बुडाले, त्यावर सरकारकडे काय उपाययोजना आहे? 2021 सालातही ती नव्हती व 2022 सालातही नसेल.
विकृत, धर्मांध विचारांचा जीर्णोद्धार व लोकांच्या बुद्धीवर गंज चढविण्याचे प्रकार
मावळते वर्ष व नवे वर्ष यात फार फरक करावा असे वातावरण नाही. 2021 सालात महात्मा गांधींविरोधात घोषणा दिल्या, नथुराम गोडसेंचा जयजयकार धर्मसंसदेच्या नावाखाली केला. ज्यांचा स्वातंत्र्यलढय़ाशी काडीमात्र संबंध आला नाही. धर्मसंसदेच्या नावाखाली गांधींना शिव्या देणारे कोणी एक साधू कालिचरण हे महाराष्ट्रातले आहेत. भारतीय जनता पक्षाने या वृत्तीचा साधा निषेध केला नाही. गोडसेंनी जीनांवर गोळी चालवली नाही. पाकिस्तानची मागणी होताना मूग गिळून बसलेल्या इतर नेत्यांवर गोळी चालवली नाही. स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना आपल्या कार्यालयांवर तिरंगा न फडकवणाऱ्या प्रवृत्तीवर गोळी चालवली नाही, पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरगळलेल्या समाजाला जिवंत करणाऱ्या गांधीजींवर गोळी चालवली. ज्यांना गांधीजींवर हल्ले करणाऱ्यांचा विचार मान्य आहे त्यांनी जगात जाऊन गांधी विचारांचा वारसा सांगू नये आणि गांधी जयंतीस त्यांच्या समाधीस्थळी जाऊन नतमस्तक होण्याचे तरी ढोंग करू नये. 2014 साठी देशाला मोदींचे नेतृत्व लाभले तेव्हा देश नव्या क्रांतीमार्गाने जाईल अशा अपेक्षेत आपण सगळेच होतो. तो सर्व विचार निरुपयोगीच ठरला. 2014 ते 2022 या काळात देशाला आधुनिकतेकडून पुरातन, बुरसटलेल्या काळात नेण्याचेच प्रयत्न झाले. विकृत, धर्मांध विचारांचा जीर्णोद्धार व लोकांच्या बुद्धीवर गंज चढविण्याचे प्रकार झाले.
झाले ते पुरे झाले. 2022 सालात तरी शहाणे व्हा!
घराणेशाहीच्या विरुद्ध व भ्रष्टाचाराच्या विरुद्ध या देशातील बहुतेक वृत्तपत्रांनी एकत्र येऊन काँग्रेस पक्षाशी लढाई दिली आहे. आज घराणेशाहीची जागा हुकूमशाहीने घेतली व भ्रष्टाचार कायम आहे. सत्तेवर काँग्रेस नाही, पण वृत्तपत्रे व माध्यमे झोपली आहेत. अण्णा हजारेही जणू हतबल होऊन पडले आहेत. देशाची आर्थिक स्थिती तर साफ खालावलेली आहे, पण लोकांना ते दिसत नाही. हिंदू समाजाला अस्थिर व अशांत ठेवले की लोकांना प्रश्न दिसत नाहीत. देशातील सर्वजण शेवटी एका मृगजळामागे धावत आहेत. खासगीकरणाच्या नावाने सगळे विकणे सुरू आहे. त्यामुळे कोटय़वधी नोकऱया धोक्यात आल्या. राजकारण्यांची विश्वासार्हता रसातळाला नेणारे वर्ष मावळले म्हणत नवे वर्ष कोणत्या आशांची किरणे दाखवणार? देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कर्ज अधिक या स्थितीत आपण चाललो आहोत. पेट्रोल, डिझेलचे भाव कमी करणे आता अशक्यप्राय बनले आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले ते नेहरूंच्या धोरणांमुळेच असे खापर फोडून मोदी व सरकार 12 कोटींच्या नव्या मर्सिडीज बेन्झ गाडीत विराजमान झाले आहेत. मोदी यांचे वृत्तवाहिन्यांवरील रोजचे 'दर्शन' पाहिले तर तेच स्वतः भ्रमंतीसाठी वेळ आणि पेट्रोल किती खर्च करीत आहेत ते लक्षात येते. मंत्र्यांच्या मोटारी, उद्योगपती, बड्या नेत्यांची चार्टर विमाने उडतच आहेत आणि लोकांना मात्र उपदेशाचे डोस पाजले जात आहेत. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देताना सामान्य लोकांना एकच विनंती करायची आहे, झाले ते पुरे झाले. 2022 सालात तरी शहाणे व्हा! नेते व मंत्री रोज खोटे बोलतात. त्यांचे इतके मनावर घेऊ नका. कारण शेवटी चुकीच्या माणसांना अंबारीत बसविण्याचे कार्य तुमच्याच हातून घडत असावे.