मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ही परीक्षा विद्यार्थ्यांनी घरातूनच द्याव्यात यावर कुलगुरुंचे एकमत झाले आहे. यामुळे त्यापद्धतीनेच परीक्षा होतील व निकालही वेळेत लागेल, असा विश्वासही यावेळी मंत्री सामंत यांनी व्यक्त केला.
राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये एकूण 7 लाख 92 हजार 385 विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतली, जावी अशी विनंती राज्यातील बहुतांश विद्यापीठाने केली आहे. यामुळे विद्यापीठाची एकूणच मागणी लक्षात घेऊन या संदर्भातील माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाला तातडीने कळविले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर परीक्षा कशा घ्याव्यात यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. या समितीबरोबर आणि कुलगुरूंसोबत चर्चा झाली. त्या चर्चेनंतर राज्यातील सर्व विद्यापीठाची परीक्षा कशी घ्यायची याविषयीचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील बहुतांश विद्यापीठांनी राज्य सरकारला विनंती केली आहे की, युजीसीकडे 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मागावी. यामुळे याविषयी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. तसेच आपत्कालीन व्यवस्थापन बैठक घेतली जाईल आणि आठवड्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली.
परीक्षा कशा पद्धतीने आणि कोणत्या सोप्या पद्धतीने घ्यायच्या याबाबत समिती बुधवारी (2 सप्टें.) आपला प्रस्ताव सादर करणार आहेत. काही विद्यापीठे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लावतील. मात्र, ही परीक्षा घेताना विद्यार्थ्यांना घराबाहेर पडून परीक्षा द्यावी लागणार नाही, त्यासाठीची तरतूद केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी घरातच परीक्षा द्यावी याबाबतचे कुलगुरूंचे एकमत झाले आहे. त्याच पद्धतीने परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. कोरोनाच्या काळात परीक्षा घेणे जिकरीचे आहे. पण, कुलगुरू ते योग्य पद्धतीने पार पाडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे विद्यार्थ्यांवर फारसा ताण येणार नाही विद्यार्थी घरीच राहून ही परीक्षा सुरक्षितपणे देतील आणि त्याचा निकालही वेळेस लागेल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही विद्यार्थ्यांच्या परीक्षा सोप्या पद्धतीने कशा घेतल्या जातील याची माहिती दिली.
राज्यातील प्रत्येक विद्यापीठात कसे आहेत विद्यार्थी
- गोंडवाना विद्यापीठ - 15 हजार 600
- नागपूर विद्यापीठ - 75 हजार
- अमरावती विद्यापीठ - 70 हजार
- रामानंद तिर्थ विद्यापीठ, नांदेड - 40 हजार
- जळगाव विद्यापीठ - एक लाख 84 हजार
- औरंगाबाद विद्यापीठ - 81 हजार
- सोलापूर विद्यापीठ - 37 हजार 667
- कोल्हापूर विद्यापीठ - 75 हजार
- पुणे विद्यापीठ - 2 लाख 18 हजार 738
- एसएनडीटी विद्यापीठ - 15 हजार 880
- मुंबई विद्यापीठ - 2 लाख 47 हजार पाचशे
- बाटू -1 हजार 600
- कला आर्किटेक्चर - 9 हजार
- कालिदास विद्यापीठ - 3 हजार
- एकूण - 7 लाख 92 हजार 385
हेही वाचा - 'अनलॉक-४': राज्य सरकरातर्फे आज अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता