मुंबई - भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्यावर चार लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. 12 फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांची या प्रकरणात चौकशी होणार आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात चित्रा वाघ आक्रमक झाल्यामुळे ही कारवाई झाल्याचे तर्क लढवले जात आहेत.
काय आहे प्रकरण -
भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे सध्या अडचणीत सापडले आहेत. किशोर वाघ हे मुंबईतील परळ येथील गांधी रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते. 5 जुलै 2016ला एका प्रकरणात 4 लाख रुपयांची लाच घेताना त्यांना अटक झाली होती. त्यानंतर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आले आहे. या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची एसीबीकडून खुली चौकशीही करण्यात आली होती. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात आता लाचलुचपत विभागाकडून किशोर वाघ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संजय राठोड प्रकरणी चित्रा वाघ आक्रमक -
स्त्रियांवर अत्याचार किंवा त्यांना त्रास देणाऱ्या आरोपीला कुठलीही जात नसते. त्यामुळे शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मुसक्या आवळून त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे. पूजा चव्हाणच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार आहेत. राठोडच पूजा चव्हाण हिचा हत्यारा असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांवरही केली आहे टीका -
राज्य सरकारमधील मंत्री गुन्ह्यांवर गुन्हे करत आहेत. मात्र, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. उलट त्यांच्या विरोधात पुरावे असूनही त्यांना शिक्षा होत नाही. मुख्यमंत्री महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांना अभय देण्याचे काम करत असल्यााचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.