मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने खासदार संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली. आवाज कुणाचा या पॉडकास्टचा दुसरा भाग आज प्रसारित करण्यात आला. यावरुन शिवसेनेने तसेच भाजपने टीकास्त्र सोडले आहे. या टीकेवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप खासदार, आमदार मतदारसंघात फिरकत नाहीत, केंद्रातील एकाही मंत्र्याला काम नाही, असा प्रहार दानवे यांनी सरकारवर केला आहे. तसेच विधानसभेत देखील आमदार अनिल परब भाजप आमदारांमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.
कोरोनात मोदी कुठे गेले : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रालयातील गैरहजेरीवर भाजपने टीका केल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मंत्रालयात आल्याने काम होत असेल तर देशात परिवर्तन झाले असते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारायला हवे ते कोरोना काळात कुठे गेले होते?; असा टोला दानवेंनी भाजपला लगावला आहे.
मंत्र्याला कवडीचे काम नाही : महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात काय केले हे शेतकऱ्यांना, धारावीमधील जनतेला जाऊन विचारा. तुमचे एवढे खासदार, आमदार असून मतदारसंघात जात नाहीत. केंद्रातील एकाही मंत्र्याला कवडीचे काम नाही. 26 दिवसाचे दौरे त्याच्या हातात दिले जातात असा आरोप दानवे यांनी भाजपवर केला आहे. उद्धव ठाकरे यांचे केंद्रातल्या, राज्यातल्या मंत्र्यांना दळण दळावे लागते. तुमचे किती शिल्लक राहिले ते आधी बघा. तुमचे 105 आमदार तोंड बघत बसतात. कधी मागच्या दरवाजाने जातील कळणार देखील नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न घेतल्यास तुम्ही निवडून येऊ शकत नाही, अशी टीका देखील दानवेंनी भाजपवर केली आहे.
मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली : रत्नागिरी रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अगदी सकाळी सहा वाजल्यापासून त्या ठिकाणच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे. त्या ठिकाणच्या परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेत आहे. मुंबई गोवा महामार्गावर दरड कोसळली आहे. त्याबाबत प्रशासनाकडून तातडीने पावले उचलली जातील. रायगडमधील साडेचार हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. आज सातशे लोकांचे स्थलांतर आज होण्याची शक्यता आहे. कोणालाही पावसाचा फटका बसू नये, याची काळजी घेतली जात असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.
कर्जत जामखेड एमआयडीसी संदर्भात बैठक : आमदार रोहित पवार यांच्या मागणीसंदर्भात सामंत म्हणाले की, कर्जत जामखेड एमआयडीसी संदर्भात आम्ही बैठक बोलावली होती. मात्र, अधिवेशनामुळे मला त्या बैठकीला हजर राहण्यास वेळ मिळाला नाही. त्यातील काही तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल. आंदोलन हा त्याला पर्याय नाही, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. ते मुलाखतीत काय म्हणाले यावर मी बोलणार नाही. मी राजकारणात काही तत्त्वे पाळतो. त्यांना आमच्या सरकारबद्दल किती काळजी आहे. हे त्यांनी मुलाखतीतून दाखवून दिले आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी तेच तेच मुद्दे उपस्थित केले. राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भात फॉर्मुला काय ठरला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहिती देतील. मला या संदर्भात माहिती नाही. बाहेर गेलेल्या उद्योगासंदर्भातली श्वेतपत्रिका आम्ही याच अधिवेशनात काढणार आहोत, असे सामंत यांनी म्हटले आहे.