मुंबई - 'पारदर्शक' हा मुख्यमंत्र्यांचा लाडका शब्द आहे. त्यामुळे पूरग्रस्त जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, हे पारदर्शकपणे त्यांनी सगळ्यांना सांगण्याची गरज आहे. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयीन वार्ताहर कक्षात पत्रकारांशी संवाद साधताना लगावला.
पूरग्रस्त भागातील जिल्ह्यात सध्या मदतीची गरज आहे. याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. हे कशामुळे झाले हे शोधण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत पोचवणे, त्यांना औषधांचा साठा पुरवणे आणि त्यांची घरे तत्काळ कशी उभी करता येतील हे पाहणे गरजेचे आहे. हा एक भावनिक विषय आहे, नुसते घर दिले, बिस्किटचा पुडा दिला की आपली जबाबदारी संपणार नाही. तर, तिथे जावून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याची आपली जबाबदारी आहे, असेही खासदार सुळे म्हणाल्या.
शरद पवार मुख्यमंत्री असताना लातूरचा भूकंप झाला होता. त्यावेळी सलग १५ दिवस प्रशासन घेऊन ते लीड करत होते, अशी आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितली. जेव्हा असे प्रसंग येतात त्यावेळी तिथे जावून मांडी घालून बसलंच पाहिजे आणि लोकांना वेळ दिला पाहिजे, असेही खासदार सुळे यांनी सांगितले.
पवार साहेब आजही कराडला जात आहेत. आमचे सगळे नेते विशेषतः दादा, धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हसन मुश्रीफ आदींसह सगळेच नेते आपापल्या क्षेत्रात जावून अंग झटकून काम करत आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे, असेही खासदार सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.