मुंबई - राज्यासह देशभरामध्ये सध्या ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावण्याचा घटना समोर येत आहेत. अशा प्रसंगी रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत आणि त्यांना ऑक्सिजन वेळेत मिळावा यासाठी सध्या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर संजीवनी ठरत आहे. परंतु, या उपकरणांची उपलब्धता ही मर्यादित असल्यामुळे, तसेच ही उपकरणे महागडी असल्यामुळे अनेकांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर खरेदी करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीमध्ये भांडुपमधील माऊली मातोश्री फाउंडेशन नावाची संस्था ही रुग्णांसाठी मदतीचा हात घेऊन आली आहे. ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर व्हॅनच्या सहाय्याने या संस्थेतील सदस्य ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांपर्यंत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मोफत पोहचविण्याचे काम करत आहे.
हेही वाचा - आठवड्यातून 4 दिवस दुकान उघडण्यास परवानगी द्या, सलून व्यवसायिकांची मागणी
ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर गरजूंपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न
सध्या कोविड सेंटरवर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यात अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी दगावल्याची उदाहरणे देखील समोर आलेली आहेत. अशा परिस्थितीत जर ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहचविले तर या रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्यापेक्षा त्यांना घरीच विलगिकरण करून त्यांच्यावर उपचार करता येणे शक्य होईल. आणि ज्या रुग्णांना रुग्णालयात उपचार घेण्याची नितांत गरज असते, अशा रुग्णांना उपचार रुग्णालयात घेता येतात, मात्र याचा खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे ही उपकरणे सर्वांनाच खरेदी करता येणे शक्य नसते, त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्था आता या उपकरणांना खरेदी करून ती गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
संस्थेकडे १२ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर उपलबध
माऊली फाउंडेशनच्या वतीने अशा रुग्णांना मोफत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन पुरविल्या जात आहे ज्या रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची गरज आहे. असे रुग्ण या संस्थेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधतात आणि त्यानंतर ही संस्था अनेक समाजसेवी व्यक्तींकडून संस्थेला देण्यात आलेले ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर रुग्णांपर्यंत पोहचवतात. आतापर्यंत 12 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर या संस्थेकडे उपलब्ध आहेत.
ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर व्हॅन बनवली
गरजू रुग्णांपर्यंत मोफत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन पोहचविण्याचे काम आम्ही करत आहे. यासाठी आम्ही एक ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर व्हॅन बनवली आहे. या व्हॅनच्या माध्यमातून जे रुग्ण या उपकरणासाठी या संस्थेकडे संपर्क साधतात त्या रुग्णांच्या घरापर्यंत, तसेच रुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयापर्यंत ही संस्था या मशीन पुरविते. त्यामुळे, अशा रुग्णांना संस्थेच्या या उपक्रमामुळे दिलासा मिळत आहे. आतापर्यंत असे 12 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि ते गरजू रुग्णांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असे माऊली मातोश्री फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीष सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा - दारूचा काढा 'त्या' डॉक्टरला पडणार महागात; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा सुमोटो