मुंबई - उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अशा विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यापूर्वी कोरोनावरील लस देणे गरजेचे आहे. मुंबईत अशा 1875 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे. परदेशात शिकण्यास जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे आजही (बुधवारी) लसीकरण सुरू राहणार आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार असल्याने ही मुदत विद्यार्थ्यांसाठी कमी करून सहा आठवडे करावी, अशी मागणी पालिकेने केंद्र सरकारला पत्राद्वारे केली आहे.
या विद्यार्थ्यांचे लसीकरण -
जगभरात कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. देशाबाहेर शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी पालिकेने राजावाडी, कस्तुरबा आणि कूपर रुग्णालयात लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली. परदेशी शिक्षण घेण्याबाबतच्या कागदपत्रांची खातरजमा करून विद्यार्थ्यांना लस दिली जात आहे. गेल्या दोन दिवसात मुंबईत 1875 परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. बुधवारीही परदेशी शिक्षणाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे राजावाडी, कस्तुरबा आणि कूपर रुग्णालयात लसीकरण केले जाणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रांवर 300 डोस उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा - अव्वाच्या सव्वा बिल आकारणाऱ्यांना चाप.. सरकारकडून कोरोनावरील उपचारासाठी खासगी रुग्णालयांचे दर निश्चित
विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा गंभीर प्रश्न -
मुंबईत सध्या लसींचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहिमेचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे १८ ते ४४ वर्षे वयोगटाचे लसीकरणही सद्या स्थगित आहे. त्यामुळे परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने अशा विद्यार्थ्यांसाठी कस्तुरबा, राजावाडी आणि कूपर रुग्णालयात थेट लस घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही लस घेताना विद्यार्थ्यांनी परदेशी विद्यापीठ प्रवेश निश्चिती पत्र, परदेशी व्हिसा, व्हिसा मिळवण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले आय-२० किंवा डीएस-१६० फॉर्म ही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
यासाठी प्रशासनाने घेतला निर्णय -
दुसर्या डोसमधील अंतर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ८४ दिवस करण्यात आला आहे. मात्र, परदेशातील बहुतांशी विद्यापीठांचा अभ्यासक्रम ऑगस्टदरम्यान सुरू होतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दुसरा डोस घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे दुसर्या डोसबाबत पालिकेने निर्णय घ्यावा अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून करण्यात येत होती. याचा विचार करून पालिकेने केंद्राला पत्र पाठवून दोन डोसमधील ८४ दिवसांचे अंतर विशेष बाब म्हणून सहा आठवड्यांपर्यंत कमी करावे, अशी मागणी करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना डोस मिळेपर्यंत मोहीम सुरूच राहणार असल्याचेही काकाणी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - बारावीच्या परीक्षांबाबत राज्य सरकार लवकरच घेणार निर्णय - वर्षा गायकवाड