मुंबई - अनेक सरकारी कर्मचारी आपल्या कौटुंबिक अडचणी असल्याची कारणे सांगून कामचुकारपणा केल्याची अनेक उदाहरणे आपण यापूर्वी पाहिली आहेत. मात्र सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई सात महिन्यांची गर्भवती आहे. अनेक शारीरिक अडचणी असताना, कोरोनाचा काळ तसेच उन्हाचा त्रास सहन करून ही भारतमातेची लेक आपल्या कर्तव्याला न्याय देत आहे. याबाबत ईटीव्ही भारताने घेतलेला हा आढावा...
पोलिसांवर कामाचा ताण -
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र्रात कोरोनाच्या दुसरी लाट आली आहे. या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कठीण काळात फ्रंट वॉरियर्स आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा बजावत आहे. यादरम्यान, 7 महिन्याची गर्भवती महिला पोलीस शिपाई रूपाली बाबाजी आखाडे कोरोनाच्या लढ्यात खाकी साडी घालून रस्त्यावर उतरली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कॉन्स्टेबल रूपाली आखाडे गेला तीन वर्षांपासून काम करत आहेत. संपूर्ण राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात मुभा दिलेली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. अगोदरच गेल्या एका वर्षांपासून पोलिस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. पोलिसांचा खांद्यावरील ताण बघून रूपाली आखाडे ही महिला पोलीस शिपाई सात महिन्याचे पोटात बाळ असताना सुद्धा आपली सेवा बजावत आहे.
रूपाली बजावते 12 तास ड्युटी-
पोलीस शिपाई रूपाली आखाडे यांची सीएसएमटीच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांची ड्युटी आहे. दररोज सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यत 12 तास आपली ड्युटी बजावते. दररोज अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ओळखपत्र तपासणी आणि त्यांना रेल्वे स्थानकात प्रवेश देण्याचे काम त्या करत आहे. इतकेच नव्हे तर प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहनही रूपाली करत आहे. त्या गेल्या 9 वर्षापासून लोहमार्ग पोलीस दलात कार्यरत आहे. दीड वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले. रुपालीचे पती एका खासगी कंपनीत कामाला आहेत. घरी सासू-सासरे आणि ननंद असा परिवार आहे. या सर्व कुटुंबाच्या गा़डा त्या चालवत आहे. सध्या रूपालीच्या पोटात 7 महिन्याचे बाळ असताना सुद्धा ते आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहे. रूपालीला पोलीस दल आणि कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात तिला सहकार्य लाभत असल्याची माहिती त्यांनी ईटीव्ही भारतला दिली.
नागरिकांनी सहकार्य करावेत-
मी गर्भवती असताना देखील कर्तव्यावर येत आहे, याचे कारण म्हणजे सध्या पोलिस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण येत आहे. हा ताण लक्षात घेता मी या संकटकाळात आपले कर्तव्य बजावत आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे त्या म्हणाल्या. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रयत्न करतच आहे. पण नागरिकांनी कोरोनाला घाबरू नका, शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अत्यावश्यक सेवेतील लोकांनीसुद्धा सोशल डिस्टंसिंग पालन करून लोकल प्रवास करावा आणि वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा. जेणेकरून तुमचे कुटुंबीय आणि देश सुरक्षित राहतील, असे त्या म्हणाल्या.