मुंबई - महापालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाचा पुनर्विकास केला जाणार आहे. मात्र, याबाबतच्या निविदा प्रक्रिया रखडल्याने रुग्णालयाचा पुनर्विकास रखडला होता. स्थायी समितीच्या बैठकीत शुक्रवारी याबाबतच्या प्रस्तावाला भाजपाने विरोध केला. तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि सत्ताधारी शिवसेनेने एकत्र येत प्रस्ताव मंजूर केला. यामुळे अनेक वर्षे रखडलेला सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
१९०० खाटांचे रुग्णालय -
सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय १९०० खाटांचे केले जाणार आहे. या रुग्णालयाच्या आवारातच वैद्यकीय महाविद्यालय, २० मजल्याची परिचारिका महाविद्यालय व निवासी अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान इमारत, १९ मजल्याची कर्मचारी निवासस्थानाची इमारत, २५ मजल्यांची पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह इमारत, ३ मजल्याची तात्पुरता निवारा इमारत बांधली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता. यावर बोलताना भाजपाचे भालचंद्र शिरसाट यांनी एकच निविदाकार आला आहे, एकच निविदाकर असताना सिव्हीसीच्या गाईडलाईन का पाळण्यात आल्या नाहीत? जुना प्रस्ताव रद्द केला नसताना नवा प्रस्ताव कसा आणला? असे प्रश्न उपस्थित करत हा प्रस्ताव मंजूर करू नये, अशी मागणी केली. भाजपाचे मकरंद नार्वेकर आणि राजश्री शिरवडकर यांनी शिरसाट यांना साथ दिली.
हेही वाचा - नागपूर हिवाळी अधिवेशन : आयोजनासंदर्भांत संभ्रम; अंतिम निर्णय मुंबईत
खोट बोलून रुग्णालयाचे काम थांबवू नका -
तर यावर बोलताना, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास गरीब रुग्णांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र, भाजपाला हे बघवत नाही. भाजपा मुंबईकरांच्या सोबत नाही तर उद्योगपतींसोबत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. तर कंत्राटदाराबरोबर वाटाघाटी करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यावेळी भाजपाने मंजुरी दिली होती. आता मात्र भाजपा विरोधात बोलत आहे. खोट बोलून तुम्ही देशाचा सत्यानाश केला. रुग्णालयाबाबत असे करू नका, असे आवाहन रवी राजा यांनी भाजपाला केले. चांगल्या प्रकल्पाला साथ द्या, असे आवाहन करताना सरकारमध्ये तुम्ही सोबत असता तर हाच प्रस्ताव मंजूर केला असतात, असे खडे बोल रवी राजा यांनी भाजपा सदस्यांना सुनावले. दरम्यान, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रस्ताव मंजूर केला.
काय आहे नेमका प्रस्ताव -
सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय १९०० खाटांचे केले जाणार आहे. या रुग्णालयाच्या आवारातच वैद्यकीय महाविद्यालय, २० मजल्याची परिचारिका महाविद्यालय व निवासी अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान इमारत, १९ मजल्याची कर्मचारी निवासस्थानाची इमारत, २५ मजल्यांची पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह इमारत, ३ मजल्याची तात्पुरता निवारा इमारत बांधली जाणार आहे. त्यासाठी नवी दिल्लीतील अर्कोप व शशांक मेहेंदळे अॅण्ड असोसिएटसने आराखडे बनवले आहे. पालिका यासाठी ६७२.५५ कोटी रुपये खर्च करणार आहे.