मुंबई - राज्य सरकारकडून लॉकडाऊन शिथिल केला जात असतानाच राज्यात मंदिरे खुली करण्याची मागणी जोर धरायला लागली आहे. मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी मुंबईत भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. विधान परिषदेचे विरोधी प्रवीण दरेकर आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्त्वात प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराबाहेर हे आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी सिद्धिविनायक मंदिरात कार्यकर्ते आणि नेत्यांनी सोशल डिस्टनसिंगच्या नियमाचे तीनतेरा वाजविल्याचे पाहायला मिळाले.
देशात कोरोनाचे थैमान असून या पार्श्वभूमीवर राज्यात लॅाकडाऊन करण्यात आले होते. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील मंदिरे बंद आहेत. मात्र, राज्य सरकारकडून अनलॉक 5 अतंर्गत अनेक बाबींमध्ये शिथिलता देत अनेक ठिकाणे सुरू करण्यात आले. मात्र प्रार्थनास्थळे अजूनही बंदच आहे. त्यामुळे मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी आज भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबईत प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराबाहेर आंदोलन केले. मात्र, सिद्धिविनायक मंदिरात यावेळी सर्व कार्यकर्ते व नेते प्रवेश करताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. गर्दीतून वाट काढताना नेत्यांनाच सोशल डिस्टनसिंग आणि मास्कचे भान यावेळी नव्हते, त्यामुळे मंदिरे सुरू करण्याच्या नादात शासनाच्याच नियमांची पायमल्ली करताना आंदोलनकर्ते आढळले.