मुंबई - रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांची सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात सीबीआयकडून कडक चौकशी केली जात आहे. या संदर्भात अमली पदार्थांच्याबाबतीत सुद्धा प्रकरण समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून तपास केला जात आहे. एनसीबीकडून मंगळवारी एका ड्रग्स माफियाला अटक करण्यात आली असून रिया चक्रवर्ती हीचा भाऊ शोविक चक्रवर्ती याचा या माफियासोबत संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सीबीआयकडून शोविक चक्रवर्ती याची चौकशी सुरू असताना शोविकच्या मोबाईल फोनमधील डिलीट करण्यात आलेले व्हॉट्सअॅप चॅट सीबीआयने पुन्हा रिकव्हर केले आहेत. यामध्ये शोविक चक्रवर्ती हा एका ड्रग्स माफियासोबत त्याच्याकडील 'बुम' (अमली पदार्थाचे सांकेतिक नाव) संपले असल्याचे सांगत आहे. शोविक त्याला ही बुम नावाची गोष्ट त्याच्या वडिलांसाठी हवी असल्याचेही म्हणतोय. यात समोरचा माफिया हा शोविक मागत असलेल्या गोष्टीची उपलब्धता करून देतोय, असेही म्हणतोय.
दरम्यान, मंगळवारी रिया चक्रवर्तीच्या आई वडिलांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावला होता. यावेळी दोघेही चौकशीसाठी सीबीआयसमोर हजर झाले होते. यावेळी सुशांत, रिया यांच्या संबंधांविषयी आणि सुशांतच्या कुटुंबाविषयी सीबीआयने रियाच्या आईवडिलांना काही प्रश्न विचारले होते.