मुंबई - राज्यात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर शिवसेना काय करणार, यासाठीचा वचननामा पक्षाने प्रसिद्ध केला आहे. , आज(12 ऑगस्ट) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर त्याचे प्रकाशन करण्यात आले. भाजपचा जाहीरनामा येण्याआधीच शिवसेनेने आपला वचननामा जाहीर केला आहे. आम्ही दिलेले वचन पूर्ण करतो. म्हणून हा पुढील पाच वर्षांसाठी आमचा जाहीरनामा नसून वचननामा असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
सेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वचननामा प्रसिद्ध करण्यापूर्वीच अनेक आश्वासनांची खैरात केली होती. त्यामुळे या जाहिरनाम्यात नेमके काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शेतकरी, महिला, युवा यांच्यासह इतरही अनेक बाबतीत शिवसेनेने मतदारांवर आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. राज्याच्या तिजोरीवरील भार लक्षात घेऊन अत्यंत जबाबदारीने आम्ही हा वचननामा बनवला आहे. सगळे काही मोफत देण्यात अर्थ नाही. सध्या मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे आवश्यक समतोल साधत आम्ही हा वचननामा बनवला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीसांवर मोदी-शाहंचा वरदहस्त, पाहा काय म्हणतायेत राजकीय विश्लेषक
'शिवसेनेच्या वचननाम्यासाठी भाजप आणि शिवसेना एकत्र बसली नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली असून आम्ही दोघे सोबत असू', असे स्पष्टीकरणही उद्धव ठाकरे त्यांनी दिले आहे. जाहीरनाम्यात मोठमोठ्या आश्वासनांची खैरात करण्यात आली असली तरी 'आरे'चा मात्र यात उल्लेखही नाही. याबाबत पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना विचारले असता, स्थानिक वचननाम्यात त्याचा उल्लेख असल्याचे स्पष्टीकरण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी दिले. आरे येथे मेट्रो कारशेड उभारणील शिवसेनेचा कायम विरोध असून सर्व पक्षांच्या नेत्यांनी आरे प्रश्नी एकत्र येऊन चर्चा करावी, असे उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.
महिलांसह पक्षातील नेत्यांना विचारात घेऊन वचननामा तयार करण्यात आला असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सरकार आल्यास वचननाम्यातील सगळे वचन पूर्ण करणार असल्याचे आश्वासनही उध्दव ठाकरे यांनी यावेळी दिले.
वचननाम्यात कुणासाठी काय
शेतकरी - शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी अल्पभूधारक व आर्थिक दुर्बळ घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 10 हजार प्रतिवर्षी जमा करणार
कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार
ठिबक सिंचनासाठी 95 टक्के अनुदान देणार
शेतमजूर महामंडाळाची स्थापना करणार
महिला - आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करणार
शेत मजूर व असंघटित महिलांसाठी समान-काम समान वेतन व आरोग्य सेवांची तरतूद
प्रमुख महानगरांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वर्किंग वुमन हॉस्टेल उभारणार
आशा वर्कर , अंगणवाडी सेविका यांच्या वेतनात मानधनात वाढ करणार
युवा - राज्यातील 15 लाख पदवीधर युवकांना "युवा सरकार फेलो" मार्फत शिष्यवृत्तीची संधी देणार
३५ वर्षांखालील युवाना स्वयंरोजगार /उद्योगासाठी एमआयडीसी मध्ये तसेच स्वतःच्या हक्काच्या घराकरिता सिडको आणि म्हाडामध्ये 2 टक्के आरक्षण देणार
शिक्षण - तालुका स्थरावर गाव ते शाळा सर्व विद्यार्थ्यांसाठी "विद्यार्थी एक्सप्रेस" या 2500 विशेष बसची सेवा सुरू करणार
आर्थिक दुर्बल घटक व शेतमजुरांच्या मुलांसाठी शिक्षन व स्वयंरोजगार प्राप्तिकरता शून्य टक्के व्याजदर कर्ज योजना राबविणार
शहर विकास - मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शहर सडक योजना आणणार
300 युनिट पर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर 30 टक्क्यांनी कमी करणार