मुंबई - दैनिक सामनाच्या अग्रलेखात आज भाजपाला शालजोडीतून चांगलेच फटकारे हाणण्यात आले आहेत. ट्रम्प यांना ऐन 'कोरोना' काळात गुजरातमध्ये आमंत्रित करून सरकारी खर्चाने प्रचार केला व त्यातूनच कोरोनाचे संक्रमण पसरले, हे नाकारता येणार नाही. आता अमेरिकेच्या लोकांनी ट्रम्प यांचे संक्रमण संपवले ते कायमचे. हिंदुस्थानातील बिहारातही तसेच सत्तांतर होत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. भारतीयांनी सरकारी खर्चाने ट्रम्प यांचा प्रचार केला असला तरी अमेरिकन जनतेने चार वर्षांची चूक आता सुधारली आहे. जो बायडन आणि तेजस्वी यादव यांचा संघर्ष अन्याय, असत्य, ढोंगशाहीविरुद्ध होता. तो यशस्वी होताना दिसत आहे, असे सामनाच्या आग्रलेखात म्हटले आहे.
अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी हिंदुस्थानी वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड झाली आहे. कमला हॅरिस यांची व्यक्तिगत पातळीवर निंदानालस्ती करण्याचा प्रकार ट्रम्प यांनी केला. एक महिला म्हणूनही कमला हॅरिस यांचा सन्मान राखण्याचे सौजन्य ट्रम्प यांनी दाखविले नाही व अशा ट्रम्प यांचे सगळय़ात मोठे पाठीराखे म्हणजे पंतप्रधान मोदी व भाजपवाले होते. आता हिंदुस्थानी वंशाच्या कमलाबाई अमेरिकेच्या उपराष्ट्रपती झाल्याचा आनंद जगभरातील भाजपाईंना झाला असेल तर ते ढोंग आहे. कारण या कमला हॅरिस यांच्याबाबत सोशल मीडियावरून अपप्रचार करण्यात भाजपाई मंडळीच आघाडीवर होती. आता जर तेच हॅरिस बाईंच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करीत असतील तर हा 'ट्रम्प'छाप विनोद म्हणावा लागेल, असाही टोला अग्रलेखातून भाजपला लगावला.
हिंदुस्थानने 'नमस्ते ट्रम्प' केले असले तरी अमेरिकेच्या सुज्ञ जनतेने ट्रम्प यांना 'बाय बाय' करून चूक सुधारली. सत्तांतराचे बाळंतपण पार पडले आहे. हिंदुस्थानातील बिहारातही तसेच सत्तांतर होत असल्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. पंतप्रधान मोदींसह नितीशकुमार वगैरे नेते तरण्याबांड तेजस्वी यादवसमोर टिकाव धरू शकले नाहीत. खोटेपणाचे फुगे हवेत सोडले, ते हवेतच गायब झाले. लोकांनीच बिहारची निवडणूक हाती घेतली. त्यांनी पंतप्रधान मोदी, नितीशकुमार यांना जुमानले नाही. तेजस्वीच्या सभांतून लाटा उसळत होत्या व पंतप्रधान मोदी, नितीशकुमारसारखे नेते निर्जीव मडक्यांसमोर घसे फोडत असल्याचे चित्र देशाने पाहिले. बिहारात पुन्हा जंगलराज येईल अशी भीती दाखविण्यात आली, पण लोकांनी बहुधा स्पष्टच सांगितले, ''आधी तुम्ही जा, जंगलराज आलेच तर आम्ही निपटून टाकू!'' अमेरिका व बिहारातील जनतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच, असे अग्रलेखात म्हटलं आहे.