मुंबई - कोरोनाच्या संकटकाळात भगवान बुद्धांची करुणा आमच्यासोबत आहे. सर्वांनी करुणा आपल्या मनी बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र् राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त राज भवन येथे राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांना बुद्धमूर्ती सप्रेम भेट दिली.
काय म्हणाले आठवले?
शांती शिवाय विकास नाही. भगवान बुद्धांचा धम्म हा समतेवर आधारित आहे. शांती, अहिंसा, करुणा या तत्वांवर आधारलेला बौद्ध धम्म संपूर्ण जगात प्रसारित झाला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जगात सर्वश्रेष्ठ असा बौद्ध धम्म दिला, याचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन यावेळी रामदास आठवले यांनी केले. विश्वशांती दुत, तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६४व्या जयंती निमित्ताने राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी यांची राजभवन येथे शुभेच्छा भेट घेण्यात आली. आठवले यांच्या वतीने बुद्धांची मूर्ती भेट देण्यात आली. या प्रसंगी बौध्द धर्मगुरु भिक्खुंना चिवरदान करण्यात आले. यावेळी भन्ते विररत्न, भन्ते कश्यप, कल्पना सरोज, आशिष देशपाडे, घनश्याम चिरणकर, प्रवीण मोरे आणि महेश लंकेश्वर उपस्थित होते.
बुद्ध जयंतीबद्दल थोडक्यात
इ. स. पू. 563मध्ये लुंबिनी येथे एका राजकुमाराचा जन्म झाला. या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. त्यांचा सांभाळ करणाऱ्या मावशीच्या नावावरून त्यांना गौतम म्हणूनही ओळखले जात होते. पुढे ज्ञानप्राप्तीसाठी गृहत्याग केला ज्ञानप्राप्ती झाल्यावर त्यांना बुद्ध ही पदवी देण्यात आली. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्माची स्थापन आणि प्रसार केला. आज भारतासह जगभरात बौद्ध धर्माचे अनेक उपासक आहेत. त्यांच्या शिकवणीला, विचारांना, ज्ञानाला उजाळा देण्यासाठी 'बौद्ध पौर्णिमा' साजरी केली जाते.