मुंबई - विधानसभा निवडणुकीचे बिगुल आता वाजले आहे. २१ ऑक्टोबरला विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीव सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. नेत्यांनी आपापले गड शाबूत राखण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर विदर्भात सध्या काय स्थिती आहे. २०१४ च्या निवडणुकीत विदर्भात भाजपचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळाले. विदर्भातील ६२ जागांपैकी भाजपला ४४ जागा मिळाल्या होत्या.
यावेळी विदर्भात भाजपला धक्का देण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रसने जोरदार तयारी सुरू केली आहे. विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभागात गेल्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळाले होते. या विभागातील ६२ जागांपैकी ४४ जागांवर भाजपने ११ जागांवर काँग्रेसने तर ४ जागांवर शिवसेनेला विजय मिळाला होता.
हेही वाचा - महाराष्ट्राचे सिंहासन... कोणाला मिळणार जनतेचा आशिर्वाद?
हेही वाचा - शरद पवार ईडी कार्यालयात जाणार नाहीत; पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर निर्णय मागे
नागपूर विभागात ३२ पैकी २६ जागा भाजपला
नागपूर विभागात विधानसभेच्या ३२ जागा आहेत. यामध्ये २०१४ च्या निवडणुकीत भाजपने २६ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने ५ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेला १ जागा मिळाली होती. यावरून नागपूर विभागात भाजपचे पूर्णपणे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळते आहे.
नागपूर जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी भाजपने ११ जागांवर विजय मिळवला होती. तर काँग्रेसला केवळ १ जागा मिळाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तर भंडारा जिल्ह्यात विधानसभेच्या ३ जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीत या जिल्ह्यातील तीनही जागा भाजपला मिळाल्या होत्या. गोंदिया जिल्ह्यात ४ जागा आहेत. गेल्या निवडणुकीत ३ जागा भाजपला, तर १ जागा काँग्रेसला मिळाली होती. गडचिरोली जिल्ह्यात विधानसभेच्या ३ जागा असून तिनही जागा भाजपला मिळाल्या होत्या. चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभेच्या ६ जागा असून, यामध्ये ४ भाजप, १ काँग्रेस तर १ जागा शिवसेनेला मिळाली होती. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. वर्धा जिल्ह्यात २ काँग्रेसच्या तर २ भाजपच्या जागा निवडून आल्या होत्या.
अमरावती विभागात ३० पैकी १८ जागा भाजपला -
अमरावती विभागातल्या ५ जिल्ह्यात विधानसभेच्या ३० जागा आहेत. यामध्ये १८ जागांवर भाजपचे वर्चस्व आहे. बुलडाणा जिल्ह्यात विधानसभेच्या ७ जागा आहे. यामध्ये भाजपचे ३, काँग्रेसचे २ तर शिवसेनेचे २ जागांवर वर्चस्व आहे. तसेच अकोला जिल्ह्यात विधानसभेच्या ५ जागा आहेत. यापैकी ४ जागा भाजपच्या ताब्यात आहेत. तर एका जागेवर भारीपचे वर्चस्व आहे. वाशिम जिल्ह्यात विधानसभेच्या ३ जागा असून २ जागा भाजपच्या तर एक जागा काँग्रेसच्या ताब्यात आहे. अमरावती जिल्ह्यातल्या ८ जागांपैकी ४ जागांवर भाजपचे २ जागांवर काँग्रेस तर २ जागांवर अपक्ष आमदार आहेत. अपक्षांमध्ये रवी राणा हे बडनेरा विधानसभेचे आमदार आहेत. तर बच्चू कडू अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच यवतमाळ जिल्ह्यातही भाजपचे वर्तस्व असल्याचे पाहायला मिळते. तेथील ७ जागांपैकी ५ जागा भाजपच्या ताब्यात आहेत. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या ताब्यात प्रत्येकी एक जागा आहे.
एकूणच विदर्भाची राजकीय स्थिती बघितली तर भाजपचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळते. यावेळच्या विधनसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेंबाधणी केली आहे.
विदर्भातील समस्या
विदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अनेक समस्या आहेत. त्या समस्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्यची माहिती मतदारांनी दिली.
१) शेतकरी आत्महत्या
२) अतिवृष्टी
३) नक्षलवाद
४) शैक्षणीक सवलतींचा फायदा नाही
५) आरोग्याच्या सुविधा
विदर्भामध्ये ओबीसींची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ओबीसींची मतेही येणाऱ्या निवडणुकीत महत्त्वाची ठरू शकतात. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून रान पेटवले होते. त्याचाही फायदा भाजपला झाला होता.
२०१४ च्या मोदी लाटेत काँग्रेसचे वर्षानुवर्ष पारंपरिक असणारे मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेले. विदर्भात काँग्रेसचा सुफडा साफ झाला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने नव्या चेहऱ्यांनी संधी देण्याची मागणी मतदार करत आहे.