मुंबई - गेले दहा महिने कोरोनामुळे लोकल रेल्वे सर्वसामन्यांसाठी बंद आहे. मात्र, लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर काही प्रमाणात लोकल सुरू झाल्या. दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलमध्ये प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. असे असताना सर्वसामान्यांना रेलवेत परवानगी नसल्याने काही लोक गैरमार्गाने प्रवास करत आहेत. त्यांच्यावर रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे.
कारवाईला न घाबरता करतात प्रवास -
लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर हळूहळू सर्व सुरू करण्यात आले. मात्र, रेल्वे सुरू करण्यात आल्या नाहीत. रेल्वे न सुरू केल्याने, परवानगी नसताना सामान्य लोक अडचणीत आहेत. त्यामुळे कारवाईला न घाबरता रेल्वेत बेकायदेशीर प्रवास करताना दिसत आहेत. यांच्यावर रेल्वे प्रशासनाने ७ महिन्यांत विनातिकिट प्रवास करणाऱ्या तब्बल १,२४,०२१ प्रवाशांवर कारवाई केली आहे.
अडचणी असल्याने सर्वसामान्यांनी केला प्रवास -
लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा बाजवणाऱ्यांना रेल्वे स्थानकात तिकिट देण्यात येते. सामान्य प्रवाशांना रस्त्याने प्रवास करावा लागतो. हा प्रवास सर्वसामान्यांना परवडत नाही. तसेच एसटी-बेस्ट फेऱ्याही अपुऱ्या पडत आहेत. खड्डे व वाहतूककोंडीमुळे अनेकांना प्रवास करताना अडचणी येतात. रुग्णालयात जाताना व कार्यालयात जाणे गरजेचे असल्याने कारवाईची तमा न बाळगता सामान्यांनी मोठ्या संख्येने प्रवास करण्यास सुरूवात केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.
सुमारे २ कोटींचा दंड वसूल -
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात जून २०२० ते जानेवारी २०२१ या काळात लोकलमधील १,०१,०१८ विनातिकिट प्रवास करणाऱ्यांकडून सुमारे २ कोटींचा दंड वसूल करण्यात आला. मेल-एक्स्प्रेसमधील २३,००३ प्रवाशांकडून १ कोटी ३६ लाखांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. पश्चिम रेल्वेवरील विनातिकिट प्रवास करणाऱ्यांची संख्यादेखील हजारोंवर असण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कारवाई करा मात्र निर्णय घेऊ नका -
गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरू होईल असे ऐकण्यात येत आहेत. सरकारकडून याविषयावर बैठका होत आहेत. मात्र, प्रत्यक्षात रेल्वे सुरू होत नाही. सर्वसामान्य नागरिक आधीच आर्थिक संकटात आहे. त्यांच्यापुढे जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याला ही कारवाई सहन करावी लागत आहे. या सगळ्याची कल्पना असताना सरकार कारवाई करते मात्र निर्णय का घेत नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहे.
हेही वाचा - 'हे तुम्हाला मनापासून करायचे आहे, की फक्त नौटंकी?'