मुंबई - येस बँक प्रकरणी केंद्रिय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) 7 ठिकाणे छापे टाकण्यात आले आहेत. येस बँकेचे माजी संस्थापक राणा कपूर यांना सक्तवसूली संचलनालयामार्फत (ईडी) अटक करण्यात आली. यानंतर त्यांना 11 मार्चपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईतील 7 ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे.
मुंबईतील इंडियाबुल्स सेंटर येथील टॉवर 2 येथील 'ए' विंग मधील 15 व्या मजल्यावरील एका कार्यालयात हा छापा मारण्यात आला. तसेच वरळी आणि एचडीआयएल येथील कार्यालयातही छापे मारण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
ईडीने तब्बल 30 तासांहून अधिक वेळ येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांची चौकशी केली होती. मात्र, ईडीकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर राणा कपूर देत नसल्याने ईडी ने त्यांना रविवारी पहाटे अटक केली आणि न्यायालयात हजर केले. यानंतर ईडी न्यायालयाने राणा कपूर याची रवानगी 11 मार्चपर्यंत ईडी कोठडीत केली आहे. या बरोबरच राणा कपूर यांच्या तीन मुली राखी कपूर टंडन, रश्मी कपूर, रोशनी कपूर यांच्या सह पत्नी बिंदू कपूर यांच्या मुंबईने दिल्लीतील निवासस्थानी ईडीने छापे मारले आहेत.
हेही वाचा - "येस बँकेचा तात्पुरता खोळंबा, आठवडाभरात बँकेचे व्यवहार सुरळीत होतील"
बिंदू कपूर या सध्याच्या घडीला 18 कंपन्यांच्या संचालक पदावर आहेत. रोशनी कपूर ही 23 तर रश्मी कपूर ही 20 कंपनीवर संचालक म्हणून आहेत. दरम्यान, यावर या सगळ्या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर मनी लाँड्रिंग केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.