मुंबई - शहर आणि जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी यंत्रणेची रंगीत तालीम घेण्यात आली. त्यानुसार मुंबईतील मतमोजणीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली आहे.
उद्या मतदान मोजणी होणार आहे. त्यामध्ये मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात अनुशक्ती नगर, चेंबुर, धारावी, कोळीवाडा, वडाळा, माहीममध्ये अनुक्रमे अठरा, एकवीस, वीस, सोळा अशा मतमोजणी फेऱ्या होणार आहेत. तसेच मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विधानसभा मतदानकेंद्रात १८, १९, २०, १८, २२ अशा फेऱ्या होणार आहेत. या सर्व फेऱ्या झाल्यानंतर निवडणूक अधिकारी रात्रीपर्यंत निकाल जाहीर करतील, अशी माहिती जिल्हा अधिकारी यांनी दिली आहे.
मुंबई जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात एकूण १२ विधानसभा मतदारसंघनिहाय होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल असणार आहेत. त्यानुसार लोकसभा मतदारसंघाच्या फेऱ्या होणार आहेत. मतमोजणी ठीक सकाळी ८ वाजता सुरू केली जाणार आहे. सर्व प्रथम सैन्यदलातील कर्मचाऱ्यांची आणि टपाल पत्र मतपत्रिकांचा मतमोजणी केली जाणार आहे. तसेच साडेआठ वाजता मशीन द्वारे झालेली मतांची मोजणी केली जाणार आहे. विधानसभा मतदारसंघातील ८४ टेबलनिहाय पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर त्यांची विधानसभानिहाय आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच मतमोजणीसाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.
मतमोजणी अधिकारी आणि कर्मचारी यांना आज प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मतपत्रिकांची मशीनवरील मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदार संघातील ५ मतदान केंद्राची निवड व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी करण्यात येणार आहे. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अंतिम निकाल घोषीत करणार असल्याचे जोंधळे म्हणाले.