मुंबई - पावसाने पुन्हा एकदा मुंबईमध्ये जोरदार हजेरी लावली आहे. दुपारी दोनच्या सुमारास मुंबईच्या पूर्व उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन तासांत मुंबई, सातारा, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पावसाच्या जोरदार सरींमुळे सखोल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. अनेक इमारतींच्या आवारात पाणी साचले आहे. सोसाट्याचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. यामुळे गारवा निर्माण झाला आहे. अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली होती. वाऱ्याचा वेग वाढत असून संततधार कायम राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
आज ७ जुलैला कोकण, गोव्यात बहुतांशी ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होईल, असा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. ८ ते १० जुलै दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.