मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बंडाच्या पवित्रा मुळे महाविकासआघाडी धोक्यात आली. शिवसेनेचे जवळपास 34 आमदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी सुरत गाठले. त्यामुळे शिवसेनेची सत्ता जाणार का ? अशी स्थिती निर्माण झालेली असताना हातातली सत्ता वाचवण्यासाठी शिवसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेने आपले सर्व उर्वरित आमदार आता मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये ठेवले आहेत.
या सर्व आमदारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेचे 27 आमदार उपस्थित असल्याची माहिती शिवसेनेच्या गोटातून मिळत आहे या सर्व आमदारांना स्वतः आदित्य ठाकरे यांनी हॉटेलमध्ये नेल आहे. शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक वर्षा बंगल्यावर पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सिल्वर ओक निवासस्थानी घेतली असून राजकीय परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
तर काँग्रेसने देखील आपल्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरी बोलावली होती. महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील, बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या बैठकीला उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ही काँग्रेस पक्ष पूर्णपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.
हेही वाचा : Maharashtra Political Crisis : भाजपाची सत्ता आणि मला उपमुख्यमंत्री पद तरच... - एकनाथ शिंदे